लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेत आत्महत्या केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ती गेले वर्षभर इंदौर याठिकाणी राहत होती. तिच्या राहत्या घरी तिने आत्महत्या केली. या प्रकरणातील आता मोठी अपडेट समोर आली आहे.
वैशाली ठक्करने वयाच्या २९ व्या वर्षी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणात तेजाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून एक नोटही जप्त करण्यात आली आहे. त्यावरून तिच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे.
वैशालीच्या आत्महत्येनंतर त्याठिकाणी जी सुसाइड नोट आढळली आहे, त्यातून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार वैशाली टक्कर अनेक दिवसांपासून तणावाखाली होती. यासंदर्भातील उल्लेख तिथे सापडलेल्या नोटमध्येही आहे.
तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत असल्याचेही या चिठ्ठीत म्हटले आहे. मात्र, तिचा एक्स बॉयफ्रेंड कोण होता, त्याचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये वैशालीने चाहत्यांना माहिती दिली होती की तिचा साखरपुडा झाला आहे.
तिने तिच्या रोका समारंभाचा एक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केलेला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव डॉ. अभिनंदन सिंह असून तो एक डेंटल सर्जन आहे. खासगी कार्यक्रमात त्यांनी हा सोहळा केला होता. तिचा होणारा नवरा केनियातील रहिवासी होता.
मात्र महिनाभरातच तिने हे लग्न रद्द झाल्याचेही सांगितले. शिवाय तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तिच्या रोका समारंभाचा व्हिडिओही काढून टाकला. वैशाली बद्दल अधिक माहिती म्हणजे, वैशालीने ‘ससुराल सिमर का’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘सुपर सिस्टर्स’, ‘विश या अमृत’, ‘मनमोहिनी २’ आणि ‘ये है आशिकीया’ यासारख्या असंख्य मालिकेत काम केले आहे.