दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होताना दिसत आहे. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाच्या माध्यमातून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना रातोरात स्टार बनवून टाकले आहे. परंतु या मुलांनी देखील इथपर्यंत पोहचण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे.
नुकतीच या चित्रपटातील बाबूचे पात्र निभावणाऱ्या प्रियांशु ठाकूरने बीबीसीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने झुंड चित्रपटासोबतचा आपला संपूर्ण प्रवास अगदी बिनदास्तपणे बीबीसाला सांगितला आहे. यावेळी त्याने म्हटले आहे की, या चित्रपटामुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले आहे. आता झुंडच्या आधीचे आयुष्य आणि अगोदरचे आयुष्य यात खूप फरक पडला आहे.
पुढे त्याने, “मी आधी केवळ बदमाशी करायचा विचार करायचो, नागपूरमध्ये तेच चालायचं. पण आता वाटतं की कोणी मोठं बनता नाही आलं तरी चालेल नागराज सरांसारखा एक साधा माणूस बनायला हवं.” अशा भाषेत नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे.
तसेच चित्रपटाविषयी आपला अनुभव व्यक्त करताना, “फिल्म रिलीज झाल्यापासून जेवढं प्रेम मिळतंय ते आधी कधीच मिळालं नव्हतं. मी फिल्म रिलीज झाल्यापासून अजून घरी देखील गेलो नाहीये. आई-वडिलांना सुद्धा भेटलो नाहीये. लोक खूप प्रेम करताहेत, सेल्फीसाठी रांग लावत आहेत. आता काहीतरी केल्यासारखं वाटतंय. वस्तीतले लोकसुद्धा मान देत आहेत. फिल्म आल्यानंतर आता वाटतंय आयुष्य जगण्याची मजा आहे.” असे बाबुने सांगितले आहे.
इतकेच नव्हे तर, या चित्रपटाच्या ऑडिशन वेळीचा एक किस्सा बाबूने यावेळी बीबीसी मराठीला सांगितला आहे. त्याने म्हटले की, “अंकुश आधी माझ्या घरी माझ्या आईशी फिल्मबद्दल बोलायला गेला, तेव्हा माझ्या आईला खरं वाटत नव्हतं. तिनं अंकुशला ‘बाबू नाहीये’ इथं असं सांगितलं. नंतर मी आईला सांगितलं मी फिल्मसाठी ऑडिशन दिली आणि सिलेक्ट झालो.
माझ्या आईला तरी विश्वास बसत नव्हता. तुला कसं निवडतील, असं मलाच तिनं विचारलं. मुंबईला नेऊन किडनी वगैरे विकतात अशी भीतीही घातली. मला पण वाटलं की, खरंच असं झालं तर…?” पुढे बाबूने सांगितले, “नंतर मला शुटिंगसाठी पुण्याला बोलवलं. तेव्हासुद्धा माझ्या मनात धाकधूक होती की पुण्याला नेऊन किडनी काढून घेतली तर? मग मी माझ्या तीन-चार मित्रांना सुद्धा सोबत घ्या, असं म्हणालो. मी मनात विचार केला माझी काढली तर यांचीसुद्धा काढतील.”
सध्या झुंड चित्रपटातील बाबूचे संवाद लोकांच्या पसंतीस पडत आहेत. त्याने निभावलेल्या पात्राचे देखील लोक कौतुक करत आहेत. त्यामुळे आज मी जो काही आहे तो नागराजमुळे असल्याचे प्रियांशु म्हणजेच बाबू सर्वांना सांगत आहे. आता त्याला इथून पुढे याच क्षेत्रात काम करायचे असल्याची इच्छा प्रियांशुने व्यक्त केली आहे.
दरम्यान ‘झुंड’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नागपूरमधील विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘आई बनणं नव्हतं शक्य’ गरोदर राहण्यापूर्वी सोनम कपूर करत होती ‘या’ गंभीर आजाराचा सामना
‘…तर आई बनणं होतं कठीण’ सोनम कपूरने स्वतःच केला गंभीर आजाराचा खुलासा
स्वरा भास्करसोबत कॅब चालकाचं विचित्र कृत्य, अभिनेत्रीनं ट्विट करत सांगितला धक्कादायक घटनाक्रम
टाटाच्या ‘या’ शेअर्सने दिला गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न; 11 दिवसांपासून धरला आहे रॉकेट स्पीड