सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात वादावरून निवडणूक आयोगाच्या कामकाजास स्थगिती देण्यास नकार दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी दाव्यांबाबत निवडणूक आयोगाकडून काय निर्णय येतो, याबद्दल सर्वांना उत्सुकता लागून आहे.
या पार्श्वभूमीवर काल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गुजरातमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राजीव कुमार हे गुजरातमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राजीव कुमार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून किंवा निवडणूक चिन्ह देण्याच्या अर्जावर निर्णय देताना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जाईल, तसेच निवडणूक आयोगाकडे बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया आहे असून या प्रकरणातही आयोगाकडून ती प्रक्रिया केली जाईल, असे राजीव कुमार म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत बोलताना राजीव कुमार म्हणाले, राजकीय पक्षाबाबत आणि त्याच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आधीपासूनच आहे. शिवसेनेच्या प्रकरणातही संघटनेतील बहुमताची चाचपणी करून आम्ही निर्णय घेऊ.
दरम्यान, काल महाराष्ट्राच्या सत्तानाट्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हावर काहीही निर्णय घेण्यापासून रोखावं अशी मागणी ठाकरे गटातून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती.
मात्र, कोर्टाने ठाकरे गटाची ही मागणी फेटाळून निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीत स्थगिती नसेल, असा निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.