एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केले, आणि बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला.
शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात गेले, आणि खासदार देखील शिंदे गटात सामील होत आहेत. अशातच आम्हीच शिवसेना आहोत असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे. त्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत वाद प्रतिवाद होत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला विधानसभेतील ५० आमदारांनी आणि लोकसभेतील १२ शिवसेना खासदारांनी समर्थन दिलं आहे. दोन तृतीयांश बहुमत शिंदे यांच्याकडे असल्याने गटनेता आणि प्रतोद बदलून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदार, खासदार, नगरसेवकांसह स्थानिक पातळीवरील पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत. त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न पडला आहे.
याबाबत सी-वोटर इंडिया ट्रॅकरनं लोकांची मतं जाणून घेतली आहेत. देशपातळीवर हा सर्व्हे घेण्यात आला आहे. या सर्व्हेत शिवसेनेतील सध्या चित्राबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेत एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे नवे प्रमुख म्हणून उभारी घेत असल्याचं बहुतांश लोकांनी मत व्यक्त केलं.
या सर्वेक्षणादरम्यान विरोधी पक्ष आणि एनडीए या दोन्ही मतदारांची शिवसेनेच्या नेतृत्वाबाबतची मते भिन्न होती. दोन्ही गटातील मोठ्या वर्गाने शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिसाद दिला आहे. सर्व्हेक्षणाच्या आकडेवारीवरून पुढे असे दिसून आले की, ६१ टक्के ग्रामीण मतदारांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर पकड मजबूत केली असल्याचं सांगितलं.
.