जम्मू काश्मीरमधील पुंँछ जिल्ह्यातील सवजियानमध्ये पाकिस्तानी सैन्याशी प्रतिकार करताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी मधील जवान ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. सध्या याच ऋषीकेश यांच्या कुटूंबियांसंदर्भात एक गंभीर बातमी समोर येत आहे.
ऋषीकेष यांना ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानी सैन्यांशी प्रतिकार करताना वीरमरण आले. ते अवघे २० वर्षांचे होते. आता त्यांच्या कुटूंबियांना त्यांच्या गावातील ग्रामसेवक त्रास देत असल्याची बातमी समोर येत आहे. राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी असे ग्रामसेवकाचे नाव आहे.
कुटूंबियांनी ग्रामसेवकाकडून होत असलेल्या त्रासामुळे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. ऋषिकेश यांच्या कुटुंबियांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेच पाटील आणि जिल्हा परिषदे सीईओ संजयसिंह चव्हाण यांना पत्र पाठवले आहे.
या पत्रात ऋषिकेश यांचे वडील रामचंद्र जोंधळे यांनी लिहिले आहे की, आमच्या गावातील ग्रामसेवक मला आणि माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास देत आहेत. राज्यभरातून लोकप्रतिनिधींसह अनेकजण घरी भेट देत असल्याने ग्रामसेवक डवरी यांना या गोष्टी खटकत आहेत.
ग्रामसेवक वारंवार माझ्या कुटुंबियांना त्रास देत आहेत. शिवाय आमचा अपमान करत आहेत. १ जून रोजी माझ्याबरोबर वाद घातला. तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितले असे म्हणत ज्या तिरंग्यातून माझ्या मुलाचा देह बहिरेवाडीत आणला गेला तो तिरंगा देखील बळजबरीने काढायला लावला. तो तिरंगा मी माझ्या घराच्या पुढे उभा केला होता.
तसेच गेल्या आठवड्यात ग्रामसेवकाने भरचौकात माझ्या कुटुंबीयांची बदनामी होईल असा बोर्ड लावला. यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. रात्री अपरात्री तो शिवीगाळ, अंगावर धावून येणे असे प्रकार करत असल्याचे पत्रात लिहिले आहे. यामुळे माझ्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.