शिवसेना आणि शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून वादंग सुरू होते. मात्र, याबाबत आता निकाल लागला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत आता ठाकरेंची सरशी झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी करत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. दरम्यान, ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी खिंड लढवली आणि दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळवून दिलं.
आता नेमके हे अस्पी चिनॉय आहेत तरी कोण ? याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. तर, अस्पी चिनॉय हे मुंबई उच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ वकिलांपैकी एक आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट वकिलांपैकी ते एक मानले जातात.
मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात १९७७ मध्ये प्रॅक्टिस सुरु केली. संवैधानिक आणि व्यावसायिक केसेस, याशिवाय जनहित याचिका लढवण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो.
१९७७ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालय आणि इतर उच्च न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस सुरु केली. त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. घटनात्मक/प्रशासकीय कायद्याच्या प्रकरणात ते निष्णात आहेत.
द्वारकादास मारफतिया प्रकरण, व्होडाफोन करप्रणाली प्रकरण, बंद पुकारून आणि त्याची अंमलबजावणी केल्यामुळे झालेल्या सार्वजनिक नुकसानीसाठी राजकीय पक्षांना जबाबदार धरणे, गोमांस बाळगणे आणि खाण्यावर बंदी घालणाऱ्या १९९५ च्या महाराष्ट्र दुरुस्ती कायद्याला दिलेले आव्हान, या प्रकरणात त्यांनी वकील म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे विधी क्षेत्रातील निष्णात कायदेपंडितांकडूनही त्यांचा अत्यंत आदर केला जातो.