महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. अशातच, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
विधान परिषद निवडणुकीत २८५ आमदारांनी आपला हक्क बजावला आहे. ४ वाजता मतदान संपलं. त्यानंतर ५ वाजता मतमोजणी सुरू होणार होती. मात्र काँग्रेसने भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली.
त्यानंतर, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. म्हणाले, निवडणूक निकाल लागल्यानंतर आमची मतं कुणाला मिळाली ते स्पष्ट होईलच. मला आज फक्त काँग्रेसचे नेते भेटले नाहीत. तर भाजपचे नेते भेटले, त्यानंतर राष्ट्रवादीचेही नेते भेटले. सगळ्यांनी मला विनंती केली असे ते म्हणाले.
तसेच म्हणाले, लोकशाहीनुसार मी मतदानाचा अधिकार बजावला आहे. जे मोठे पक्ष असतात त्यांच्याकडे व्होटबँकही मोठी असते. मात्र छोटे पक्ष, अपक्ष यांना श्रम करून आपल्या कामाच्या जोरावर निवडून यावं लागतं. मोठ्या पक्षांचं पाठबळ त्या-त्या उमेदवारांच्या मागे असतं.
त्यांना काही प्रमाणात मेहनत घ्यावी लागते. मात्र आमच्यासारख्या छोट्या पक्षांना १०० टक्के मेहनत घ्यावी लागते. कार्यकर्ते आणि जनतेचं समर्थन मिळवून निवडणुकीत विजय मिळवावा लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये सर्वपक्षीय आमच्या विरोधातच निवडणूक लढवत असतात.
तसेच बहुजन विकास आघाडीची तीन मतं मिळण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही होते. याबाबत विचारलं असता हितेंद्र ठाकूर म्हणाले, कुटुंबातल्या एका सदस्याच्या उपचारासाठी क्षितिज ठाकूर परदेशात गेले होते. भेटायला आलेल्या नेत्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी खूपच आग्रह धरला म्हणून क्षितिज ठाकूर परदेशातून थेट विधीमंडळात आलेत घरीही गेले नाहीत.