संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत असलेला निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. न्यायालयाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपलं मत मांडलं आहे. तसेच शिवसेनेकडून झालेल्या चुकीवर भाष्य केलं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यावर खडसेंनी भाष्य केलं आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण, त्यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते, असे म्हणत खडसे यांनी उद्धव ठाकरेंकडून झालेल्या चुकीवर प्रकाश टाकला.
तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच धनुष्यबाण चिन्ह मिळाले पाहिजे असे विधान त्यांनी केले आहे. खडसे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला, मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
तसेच म्हणाले, चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे आयोगाच्या निर्णयानंतरच समोर येईल. शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळावा ही अपेक्षा आहे. १६ आमदार अपात्र झाले तर शिंदे आणि भाजपचेस सरकार कोसळेल, असेही खडसे म्हणाले.
दरम्यान, शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत दुर्दैवी वक्तव्य केले आहे. यावरही खडसे यांनी सडकून टीका केली. सावंत यांच्या वक्तव्याने मराठा समाजासह इतरांच्या भावना दुखावल्या असून आरक्षण मागणं चूक आहे का? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. सावंत यांनी सशर्त माफी मागण्याऐवजी बिनशर्त माफी मागावी, असे खडसे म्हणाले आहेत.