शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी झाली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर शिवतारेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली, आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतारे यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यानंतर शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यांनी यावेळी संजय राऊतांवर निशाणा साधत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलं.
शिवतारे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. ते मुख्यमंत्री असताना अनेक मागण्यांचे पत्र मी त्यांना लिहिली. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही, उत्तर मिळाले नाही. ज्यांनी १५ वर्ष मतदारसंघ बांधला त्यांना दुसऱ्या मतदारसंघात लढा असा निरोप दिला जातो, हा काय प्रकार आहे.
संजय राऊतांवर निशाणा साधत म्हणाले, संजय राऊतांची निष्ठा कुणाशी आहे हे जनतेला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण, जे सर्व महाराष्ट्राला कळतं ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना का कळत नाही?असा सवाल त्यांनी केला.
शिवतारे म्हणाले, मी उद्धव ठाकरेंसोबत १० वर्षे काम केले. कार्यकर्त्यांना सांभाळले, आमदारांना सांभाळले, त्यांच्या गोष्टी बघणे, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे हे सगळं केलं. पण, जेव्हा माझी बायपास सर्जरी झाली तेव्हा एकाही ठाकरेंनी मला फोनसुद्धा केला नाही.
माझी सर्जरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे तीनवेळा हॉस्पिटलला येऊन गेले. त्यामुळेच, अशी माणसं जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करतील तेव्हा नक्कीच महाराष्ट्राचं भलं होईल, असे शिवतारे म्हणाले. तसेच संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया आजार झाला आहे, आपल्याला सगळं कळतं असा त्यांना भास होतो, असे शिवतारे म्हणाले.