‘मी जेव्हा मुलाखत देईल तेव्हा राज्यात नाही, देशात मोठा भूकंप होईल’; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शासन आपल्या दारी’ या महाराष्ट्र दौऱ्याला मालेगावपासून सुरुवात झाली आहे. यावेळी, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन झाले. त्यांनी यावेळी मालेगावमध्ये भाषण करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदार आणि खासदार यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या उठावाची दखल ३३ देशांनी घेतली. गद्दारीचा शिक्का आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघेंबाबत काय राजकारण झाले याचा खुलासा लवकरच करेल असा इशारा उद्धव ठाकरेंना त्यांनी दिला.

तसेच म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीशी मैत्री करू नका असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. परंतु त्यांच्या विचारांशी प्रतारणा झाल्याने आम्ही वेगळा मार्ग निवडला. याशिवाय राष्ट्रवादीकडून पराभूत उमेदवारांना जास्त निधी दिला गेला हा शिवसैनिकांवरील अन्याय असल्याचं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंसमोर अनेक वेळा भूमिका मांडल्या परंतु ठाकरेंनी भूमिका समजून न घेतल्याने आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केल्यानंतर आमच्यावर नको नको ते आरोप केले गेले. शिवसेना अशीच मोठी झाली नसून शिवसेना मोठे करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली असे एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच म्हणाले, सध्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे, मी आज जाहीरपणे काही गोष्ट बोलणार नाही. परंतु, जेव्हा माझी मुलाखत होईल आणि योग्य वेळी बोलेन, त्या दिवशी या राज्यात नाही, तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला.

तसेच म्हणाले, तुम्ही आमचे आईबाप काढता. आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो, कधी आमच्या मुलांबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही वर्षातून दोन दोन, तीन तीन वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना शिवसेना करत राहिलो, असे शिंदे म्हणाले.