अग्निपथ योजनेविरोधात सध्या तरुणांकडून विरोध सुरूच आहे. ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. काँग्रेस पक्षासह विविध पक्षही आंदोलन करून अग्निपथ योजनेला विरोध करत आहेत. त्यातच आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या योजनेवरून टीका केली आहे.
ओवैसी म्हणाले, मोदी सरकार देशाच्या सुरक्षेशी खेळ खेळत आहे. चार वर्षांमध्ये कोण काय शिकू शकेल? तुम्ही खोटे बोलत आहात. पंतप्रधानांना सांगतो खेळ खेळू नका. तुम्ही नोटाबंदी केली आणि तेव्हाच ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, असे म्हणत आवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
तसेच म्हणाले, तुम्ही रातोरात चुकीच्या पद्धतीने लाॅकडाऊन लागू केले. त्याने लाखो लोकांना त्रास झाला. आज तुम्ही तरुणांबरोबर क्रूरतेने खेळ खेळत आहात, अशी टीका अग्निपथ योजनेवर असदुद्दीन ओवैसी यांनी केली. त्यांनी याआधी देखील ट्विट करून या अग्निपथ योजनेला विरोध करून मोदींवर टीका केली होती.
ओवैसी यांनी ट्विट करून पीएम मोदींना टॅग करत लिहिले होते की, तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. ओवेसींनी पुढे लिहिले की, पीएम मोदींनी त्यांना त्यांच्या कपड्यांवरून ओळखू नये, त्यांनी गोळ्या आणि बुलडोझर चालवल्या नाहीत. तुमचा चुकीचा निर्णय मागे घ्या. देशाच्या लोकसंख्येपैकी ६६% तरुण आहेत. मुद्दा समजून घ्या.
आणखी एका ट्विटमध्ये ओवैसी यांनी लिहिले होते की, अग्निपथ योजनेमुळे बेरोजगारी कमी होणार नाही तर ती वाढेल. पाकिस्तानसोबतचा दहशतवादाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आणि दुसरीकडे चीनने आमच्या भूमीवर कब्जा केला आहे. आमची सेना ही तुमच्या ‘योजना’ आणि ‘ब्रेन वेव्ह’ ची प्रयोगशाळा नाही. ही योजना देशाच्या हिताची नाही.
तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम देखील म्हणाले होते की, अग्निपथ योजना वादग्रस्त आहे. यामध्ये अनेक धोके आहेत. हे सशस्त्र दलांच्या जुन्या परंपरा आणि आचारविचारांच्या विरुद्ध आहे आणि या योजनेंतर्गत भरती केलेले सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी अधिक चांगले प्रशिक्षित आणि प्रेरित होतील याची शाश्वती नाही.