मुंबई पोलिसांवर बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप होणं, ही गोष्ट नवी असतानाच आता पुन्हा एकदा पोलिसांवर बार आणि रेस्टॉरंट मालक नाराज असल्याचं दिसून येत आहे. मुंबई पोलिसांवर रेस्टॉरंट मालकांना त्रास देण्याचे आरोप होत आहेत.
मुंबईमध्ये अनेक बार मालक आहेत, जे पोलिसांवर नाराज आहेत. त्यांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, पोलीस त्यांच्या बारमध्ये येतात, बसतात आणि काहीवेळा सोफ्यावरच झोपून जातात, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर याचा परिणाम होतो. तसेच काही बार मालकांचे आरोप आहेत की, पहाटे दीडच्या सुमारास बार बंद करण्यास पोलिसांकडून सांगितले जाते.
काही डान्सबार मालकांनी असा दावा केला की, जे पोलीस त्यांच्याकडे येतात आणि त्रास देतात. त्यांना याबद्दल प्रश्न केल्यास म्हणतात की, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा आदेश दिला आहे आणि त्याचे पालन आम्ही करत आहोत असे म्हणत धमकावतात.
बारमालकांनी पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या या त्रासाबद्दल AHAR कडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, आधीच कोरोना काळात त्यांना मोठा फटका बसला आहे, त्यात पोलीस बार मध्ये येऊन त्रास देतात. बार मध्येच झोपतात यामुळे कमाईवर अधिकच परिणाम होऊ लागला आहे.
मुंबईत एकूण 259 ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार आहेत. त्यातील बऱ्याच मालकांची पोलिसांबाबत सारखीच तक्रार आहे. पोलीस रात्री नऊ वाजल्यापासूनच बार मध्ये फेऱ्या मारायला लागतात. एवढेच नाही तर बार मालकांवर हुकूमत गाजवतात. नर्तक आणि गायकांचे फोटो काढू लागतात. त्यामुळे बार मधील ग्राहक देखील पोलिसांना घाबरतात.
पोलिसांच्या या वागणुकीचा परिणाम हा बार मालकांच्या व्यवसायावर होतो. बार मध्ये पोलीस असण्याच्या धास्तीने ग्राहक लवकरच बार मधून बाहेर पडतात. पोलीस त्यांच्या गणवेशातच येतात आणि कधी कधी बार मध्ये सोफ्यावर झोपून जातात. अशा प्रकारच्या तक्रारी बार मालकांनी केल्या आहेत. यावर आता वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी कोणत्याही व्यावसायिकाला त्रास दिला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.