बारामतीमध्ये काल, रविवारी 29 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. जे झालं ते झालं आता कशाला काढता, तुम्हाला काही करायचे असेल नविन करा, असे म्हणत भाजपवर टीका केली.
अजित पवार म्हणाले, आपल्या श्रद्धास्थानाचा मुद्दा काढून आणखी नवे प्रश्न निर्माण करायचे नसतात. तीनशे चारशे वर्षापूर्वी येथे काही तरी होते. तेथे काही तरी होते. असे मुद्दे देशात काढले जात आहेत. जे झालं ते झालं ते कशाला आता का काढता तुम्हाला काही करायचे असेल नवीन करा.
तसेच म्हणाले, कायदा सुव्यवस्था अडचणीत आणायची वातावरण गढूळ करायचे. या गोष्टी बरोबर नाहीत. हा असं म्हणाला मग आता तुमचं काय म्हणणं आहे? असे काही जण विचारतात. अरे तो म्हणाला त्याच्याशी मला काय करायचे आहे. त्याचं म्हणणं त्याला लखलाभ मला माझं लखलाभ.
एकाने काही तरी म्हणलं की दुसऱ्याने काहीतरी म्हणायचं हे काही बरोबर नाही, या गोष्टी बरोबर नाहीत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी जीएसटीबाबत बांधकाम व्यावसायिकांना देखील सल्ला दिला आहे.
अजित पवार म्हणाले, जीएसटीबाबत केंद्र सरकार खुप आग्रही आहे. तुम्ही सांगितलेल्या अडचणी आम्ही फार तर जीएसटी कॉन्सिल समोर मांडू परंतू राज्य सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. जीएसटीबाबत ज्या सुचना केल्या आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुमची अडचण होते. हे मलाही कळते. अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका.
लाकडी निंबोडी योजनेवरून सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. म्हणाले, ज्या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले, उपमुख्यमंत्री पद आतापर्यंत मिळाले. त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे. तिथे शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो. तुम्हीच ती लोकं निवडून देता. मला कोणावरही टिका करायची नाही. असे अजित पवार म्हणाले.