Share

आज माझं बरंवाईट झालं असतं तर माझ्या आईला काय वाटलं असतं; हल्ल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रीया

एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात कात्रजमध्ये हल्ला झाला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद हा विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत तुमच्याही गाड्या फुटतील, असा इशारा दिला आहे. या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला. या हल्ल्यानंतर सामंत यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन आपली तक्रार दिली.

हल्ल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतल्याबद्दल पोलिसांना सामंत यांनी धन्यवाद दिले. मात्र या हल्ल्याबद्दल कोणालाही त्यांनी संशय व्यक्त केला नाही. पण कोणी चिथावणी दिली असेल तर त्यांना शोधून काढण्याचा इशारा दिला. त्यानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

घटनेबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, माझ्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी कात्रज चौकत रेड सिग्नल असल्याने थांबलो होतो. माझी गाडी कुठे जाते, कशी जाते, याची पूर्ण माहिती घेऊन हा हल्ला करण्यात आला. माझ्या गाडीवर दगड टाकण्यात आले. लाथा मारण्यात आल्या आहेत.

तसेच म्हणाले, याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारची दहशत माजविण्याचे प्रकार आहे. मी या हल्ल्याला कोणाला जबाबदार धरणार नाही. शिवसैनिकांनाी हा हल्ला केलेला नाही. मी माझ्या नशिबाला दोष देतो आहे.

परंतु, या हल्ल्यामुळे उदय सामंत थांबणारा नाही. आज जर माझं बरंवाईट झालं असतं तर माझ्या आईला काय वाटलं असतं, माझ्या भावाला किती वाईट वाटलं असतं, परमेश्वराच्या आशीर्वादाने या मोठ्या हल्ल्यातून मी वाचलो. मी पोलिसांना यातील पाळेमुळे शोधून काढण्यास सांगितले आहे. असे हल्ले करून मी घाबरणारा नाही, असे सामंत म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now