सध्या अभिनेत्री केतकी चितळे हिचं प्रकरण राजकारणात चांगलंच गाजलं आहे. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर तिला अँट्रोसिटीच्या गुन्ह्यात अटक केली. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी तिला माफ करून संधी देण्याची मागणी केली. यावर राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट टाकत आपले मत व्यक्त केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट टाकली आहे. यात लिहिले आहे की, पुरोगामी महाराष्ट्राच्या सगळ्या महामानवांना शिव्या द्यायच्या आणि काही लोकांनी उठायचं आणि म्हणायचं निरागस आहे सोडून द्या. ह्याला काय म्हणायचे? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केतकीला माफ करा म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांना केला आहे.
त्यांनी लिहिले की, केतकी चितळे हि 34 वर्षांची आहे 29 वर्षांची नाही. ठाण्यात दाखल गुन्ह्यात केतकीचा तपास पूर्ण झाल्यावर स्वतःहून पोलिसांनी तिची पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली आहे. त्यानंतर त्या प्रकरणात इतर ठिकाणी जरी गुन्हे नोंद असले तरी तिचा राज्यातील अन्य कोणत्याही पोलिसांनी ताबा मागितला नाही अथवा तिला “त्या आक्षेपार्ह पोस्ट” फेसबुक वर अपलोड केल्याबद्दल अटक केली नाही आहे.
परंतु आवश्यक तपासानंतर तिच्या विरुद्ध पुरावा मिळाल्याने दोषारोपपत्र दाखल कारण्याची परवानगी रबाळे पोलिसांनी मागितली आहे. आता आज केतकी ला 2020 मध्ये तिने इतिहासातील महामानवांबद्दल आणि दलित समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अश्लील आणि बेताल लिखाण केल्याबद्दल अटक केली आहे.
पुढे आव्हाड लिहितात, ही पण एक समंजसपणाची कृतीच म्हणावी लागेल. 2020 मध्ये अगोदरच केतकी चितळे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत अश्लील अश्लाघ्य आणि निषेधार्य पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यावेळी म्हणजे 2020 मध्ये केतकी जरी 32 वर्षांची असली तरी नासमज आहे असे समजून पोलिसांनी कदाचित अटक केली नाही.
https://www.facebook.com/100044467058135/posts/579910003501230/
आव्हाड लिहितात की आमच्या माहितीनुसार, केतकीने या सर्व पोस्ट मीच फेसबुक वर share केल्या असून त्याबद्दल मी ठाम असून त्या डिलीट करणार नसल्याचे पोलिसांना काय न्यायालयात पण स्पष्ट सांगितले आहे. यामुळे तिला अटक करण्यात आली.
शेवटी आव्हाड यांनी लिहिले, शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, रमाई व आंबेडकरी जनता ह्यांच्या बद्दल जे काही लिहिले आहे ते निरागस बालिकेनी लिहिले आहे असे म्हणाऱ्यांचे मन कुठल्या विचारांनी भरले आहे हे स्पष्ट होते अर्थात गांधी हत्या करणाऱ्या नथूरामचे समर्थन करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या असे लिहीत भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.