Share

काय सांगता! बारामतीत मुहूर्त काढून टाकला 1 कोटींचा दरोडा, पण…; धक्कादायक माहिती आली समोर

अनेकदा आपण बघतो की मुहूर्त एखाद्या शुभ कार्यासाठी काढला जातो. असे असताना आता चोरट्यांनी चक्क ज्योतिषाकडून जबरी चोरीचा मुहूर्त काढला. विशेष म्हणजे त्यांची चोरीही यशस्वी झाली. परंतु मुहूर्त काढूनही चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

बारामतीमध्ये ही घटना घडली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकाते नगर येथील महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांचा दरोडा चोरट्यांनी टाकला होता. सागर शिवाजी गोफणे हे पत्नी तृप्ती व दोन मुलांसह देवकाते नगर येथे राहतात. सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी तृप्ती व मुले घरी होती.

चोरट्यांनी रात्री ८ वाजताच्या सुमारास गोफणे यांच्या घराच्या कंपाउंडवरून घरात प्रवेश करत तृप्ती यांना मारहाण केली. तसेच त्यांचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज चोरला.

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यामुळे पोलीस तपास करत होते. याबाबत अज्ञातांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गोपनीय खबरीच्या आधारे दरोडेखोरांना जेरबंद केले.

मुख्य आरोपी एमआयडीसीतील मजूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. जगधने याने सदर गुन्ह्याचा कट रचला आणि आरोपी रामचंद्र चव्हाण या ज्योतिषाकडे मुहूर्त काढून हा जबरी दरोडा टाकण्यात आला होता.

याबाबत सचिन जगधणे (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, ता. बारामती), रायबा चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र भोसले (वय २७, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन जाधव (वय ३५, रा. जिंती, ता. फलटण, जि. सातारा), नितीन मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा,) अशी या दरोड्यातील आरोपींची नावे आहेत.

क्राईम

Join WhatsApp

Join Now