नुकताच शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये अनेक आमदारांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कमालीची नाराजी आहे, यांपैकी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट एक आहेत. संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे.
नुकतेच शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. शिवसेनेवर टीका करणारे संजय शिरसाट अचानक शिवसेनेचं कौतूक करू लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर आता त्यांचं एक बॅनरही चर्चेत आले आहे, ज्यामुळे त्यांच्यात शिंदे गटाबद्दलची नाराजी असल्याचं बोललं जातं आहे.
आमदार संजय शिरसाट यांचं जे बॅनर चर्चेत आलं आहे, त्यावर फक्त संभाजीनगर नाव लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिरसाट यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कारण, तत्कालीन ठाकरे सरकारने औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं होतं.
मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने या नामकरणावर आक्षेप घेत कॅबिनेट बैठक बोलावून औरंगाबादचे ठाकरे सरकारने केलेलं संभाजीनगर हे नामकरण रद्द करून, छत्रपती संभाजीनगर असं केलं.
त्यात आता शिरसाट यांनी बॅनरवर छत्रपती संभाजीनगर नावाचा उल्लेख न करता केवळ संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे शिरसाट यांचे नेमके चालले काय असा प्रश्न शिंदे गटाला देखील पडल्याचं बोललं जात आहे. वारंवार शिरसाट करत असलेल्या या गोष्टींमार्फत त्यांची नाराजी झळकत असल्याचं बोललं जात आहे.
शिरसाट यांची ज्या बॅनरवरुन चर्चा रंगली आहे, ते बॅनर स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या आहेत. शिरसाट यांनी ठाकरेंचं कौतूक करणाऱ्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया देत शिंदे गटावर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. आता ते चर्चेत येणाऱ्या बॅनरवर काय प्रतिक्रिया देणार पाहावं लागेल.






