देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दिल्लीत अधिवेशन पार पडले. मात्र या अधिवेशनात नाट्यमय घडामोडी घडल्या. काल झालेल्या अधिवेशनात जे झालं ते पाहून पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी समोर आल्याचं पाहायला मिळालं.
खरं तर, कालचं दिल्लीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिवेशन राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीनाट्यामुळे गाजलं. त्याचं झालं असं की, कालच्या अधिवेशनात सगळ्या बड्या नेत्यांनी भाषण केलं. मात्र, राष्ट्रवादीचे आक्रमक नेते म्हणून ओळख असणाऱ्या अजित पवार यांनी भाषण केलं नाही.
वाचा नेमकं काय घडलं..?
दिल्लीतील अधिवेशनादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं भाषण सुरू असताना अचानक अजित पवार दोनदा उठून सभागृहाबाहेर गेले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चानी राजकीय वातावरण ढवळून निघालं.
कालच्या अधिवेशनात अनेकांचे भाषणं झाले मात्र अजित पवार यांच्या भाषणाआधी जयंत पाटील यांचं भाषण झाल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचं झालं असं, खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं. मात्र दादांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांना भाषण थोडावेळ थांबवावं लागलं.
नंतर प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना भाषण करण्याची विनंती केली. मात्र अजित पवारांच्या समर्थकांनी तेव्हाही प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. अन् त्यानंतर जयंत पाटलांचं भाषण सुरू झालं. मात्र तेंव्हा अजित पवार व्यासपीठावरून उठले आणि थेट अधिवेशाबाहेर पडले.
दरम्यान, अजित पवारांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे देखील अधिवेशनातून बाहेर पडल्या. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची समजूत घातली. त्यानंतर अजित पवार पुन्हा व्यासपीठावर आले. मात्र शेवटी शरद पवार यांचा समारंभाचे भाषण सुरू झाले होते. यामुळे या संपूर्ण अधिवेशनात अजित पवारांचे भाषण झालेच नाही.
महत्त्वाच्या बातम्या






