आपल्याकडे लग्न म्हणजे अगदी धुमधडाक्यात साजरा होणारा कार्यक्रम असतो. त्यासाठी वधू-वराची एन्ट्री कधी हेलिकॉप्टर, कधी मोटरसायकल तर कधी बैलगाडीतून होते. लग्नात शक्यतो मुलाची घोड्यावरुन वरात काढली जाते. मात्र, बुलढाणामध्ये एका दाम्पत्याने त्यांना मुलगा नसल्याने मुलीचीच वरात घोड्यावरून काढली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे लग्न समारंभ धुमधडाक्यात करता येत नव्हते. लग्नात हौसमौज करता येत नव्हती. वरात काढणं तर लांबच होतं. मात्र, आता कोरोनाचं बऱ्यापैकी संकट गेल्यामुळे अनेक ठिकाणी लग्न धुमधडाक्यात आणि बँड बाजा वाजवत केलं जातं आहे.
बुलढाण्यातील एका लग्नाची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. बुलढाण्यातील खामगाव इथल्या एका दाम्पत्याने आपल्याला मुलगा नाही म्ह्णून काय झालं असं म्हणत मुलीच्या लग्नादिवशी तिची घोड्यावरून वरात काढली आहे. या दापत्याचं नाव विजयराव सांगळे आणि पुष्पा सांगळे आहे.
या दापत्याने त्यांची मुलगी समीक्षा हिच्या लग्नात तिची गोड्यावरून वरात काढली आहे. हे लग्न 26 मार्चला झालं. समीक्षाच्या पतीचं नाव भास्कर उर्फ धनराज राऊत आहे. त्यांच्या लग्नात समीक्षाच्या आई वडिलांनी कोणतीही कसर सोडली नव्हती. बँडबाजा, डीजेच्या तालावर समीक्षाची वरात काढली.
या वरातीत 90 टक्के महिलाच होत्या. फेटे बांधलेल्या महिला डीजेच्या तालावर थिरकत होत्या. या वरातीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बुलढाण्यातील या दापत्याने मुलीचं असं लग्न लावून समाजापुढे नवीन आदर्श ठेवला आहे.
वडील विजय सांगळे हे एका खाजगी दुकानात नोकरी करतात. त्यांची पत्नी पुष्पा गृहिणी आहे. त्यांची घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या जेमतेम आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यांना मुलगा नाही याची त्यांनी कधीच खंत बाळगली नाही. मुलींना देखील मुलांप्रेमानेच वागणूक देऊन समाजापुढे आदर्श ठेवला.