सध्या टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात पिंक-बॉल टेस्ट खेळली जात आहे. बंगळूरूच्या एम चिन्नास्वामी मैदानावर हा सामना सुरु आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस होता. दरम्यान, रोहित शर्माकडून यावेळी असा अपघात झाला की चाहते देखील रोहितचे नेमके चाललंय काय असा प्रश्न विचारत आहेत.
टीम इंडियाचा दुसरा डाव सुरु असताना रोहित शर्माकडून अपघात घडला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने खेळलेल्या एका शॉटमुळे हा अपघात झाला. यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी थेट मैदानाबाहेर नेण्यात आलं.
घडलेली घटना म्हणजे, भारताच्या डावात सातव्या ओव्हरमध्ये सुरंगा लकमलच्या बॉलवर रोहित शर्माने एक शॉट खेळला. हा शॉट बॅकवर्ड पॉईंटजवळ गेला. तेव्हा श्रीलंकेचा के.पी जयाविक्रमा फिल्डींग करत होता. यावेळी तो बॉल थेट के.पी जयाविक्रमाच्या गुडघ्यावर जाऊन लागला आणि त्याला एवढी दुखापत झाली, की तो मैदानावरच कोसळला.
यावेळी त्याला झालेली दुखापत एवढी होती की, त्याला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले, आणि नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याआधी देखील टेस्टच्या पहिल्याच दिवशी रोहित शर्माने त्याच्या एका चाहत्याला अशीच दुखापत पोहोचवली होती. त्याला देखील थेट रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
टेस्टच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मा फलंदाजी करत होता, तेव्हा रोहितला शॉर्ट बॉल मिळाला जो त्याने मिड विकेटच्या वर मारला. हा बॉल थेट स्टँडमध्ये जाऊन पडला. तेव्हाच एका एका प्रेक्षकाने उत्साह दाखवत हा बॉल कॅच करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बॉल पकडता आला नाही.
बॉल थेट त्या चाहत्याच्या नाकावर जाऊन बसला. त्यामुळे त्याच्या नाकावर मोठा कट आला आणि रक्तस्राव झाला. त्याला स्टेडियमच्या रुग्णालयात प्रथम नेण्यात आलं. इथे प्रथमोपचार झाल्यानंतर व्यक्तीला रूग्णालयात दाखल केलं आणि एक्सरे काढला. त्यावेळी त्याच्या नाकाला फ्रॅक्चर असल्याचं समोर आलं. या चाहत्यांचे नाव गौरव विकास आहे.