Share

Sanjay Raut: आरोपींच्या गाडीत हत्यारं अन् जितेंद्र आव्हाडांना ठार मारण्याचा कट? संजय राऊतांचा धक्कादायक आरोप

Sanjay Raut:  महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात चांगलाच गोंधळ माजलेला असताना, विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) आवारात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) व भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांमध्ये विधानभवन परिसरात थेट मारामारी झाली. या घटनेनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राऊत म्हणाले, कालच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे. ही गोष्ट केवळ हाणामारीपुरती मर्यादित नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्ती विधानभवनात पोहोचली असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यांच्या म्हणण्यानुसार, कालच्या घटनेमध्ये काही मकोका (MCOCA) आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी देखील उपस्थित होते. इतकंच नव्हे तर त्यांच्या गाड्यांमध्ये हत्यारे असल्याची पक्की माहिती देखील राऊत यांनी दिली.

“राज्य गुंडांच्या ताब्यात, राष्ट्रपती राजवटीची गरज”

संजय राऊत यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. “काल गँगवॉर (Gang War) थेट विधानभवनाच्या लॉबीमध्ये झाला. गुंडांचे टोळके बाहेरून आतपर्यंत पोहचले. आज गाड्यांमध्ये हत्यारे, उद्या थेट सभागृहात काय येईल याची शाश्वती नाही. हे सरकार अपयशी ठरलं आहे, आणि महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल,” असं ते म्हणाले.

“ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे का?”

राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही जोरदार टीका केली. “दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) हस्तक, मोक्काचे आरोपी, भ्रष्टाचार करणारे मंत्री हे तुमच्या पक्षात घेतले जात आहेत. हा काय महाराष्ट्राचा आदर्श आहे? भाजपचे लोक फक्त सत्ता टिकवण्यासाठी गुन्हेगारांना घेऊन येत आहेत. वस्त्रहरण चालू आहे आणि मुख्यमंत्री मान खाली घालून पाहत आहेत. हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा आहे का?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

“हनी ट्रॅप प्रकरणावर सरकार गप्प का?”

सध्या सुरू असलेल्या हनी ट्रॅप (Honey Trap) प्रकरणावर फडणवीस बोलत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. “या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. सभागृहात भाजपला विरोध करणारा आवाज नको आहे, म्हणून विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत,” असेही ते म्हणाले.

“आव्हाड यांना मारण्याचा कट?”

राऊत यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करत सांगितलं की, “माझ्याकडे खात्रीशीर माहिती आहे की मकोकाच्या आरोपींच्या गाडीत हत्यारं होती. आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठार मारण्याचा कट होता.” या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now