एकनाथ शिंदेंसह बहुसंख्य शिवसेना आमदारांनी भाजपशी युती करत सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना देखील गळती लागली.
राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षातील अनेक नेते-पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश सुरू केला. एवढेच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही या सत्तांतराचा फटका बसल्याचं चित्र काल निर्माण झालं होतं. पनवेल, उरणमधील मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं वृत्त काल समोर आलं होतं.
परंतु, त्यानंतर हा पक्षप्रवेश नसून निव्वळ फसवणूक असल्याचा दावा पनवेलमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत, असं मनसे पदाधिकारी रवी बाळू पवार आणि रोहित विकास कोरडे यांनी व्हिडिओ जारी करत सांगितलं आहे.
या व्हिडीओ मध्ये बाळू पवार आणि रोहित विकास कोरडे यांनी दावा केला आहे की, काल आम्ही शिंदे गटात पक्षप्रवेश केल्याची बातमी खोटी असून, ती निव्वळ फसवणूक होती. आमच्यासोबत ३०-४० जण होते. आम्हांला मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी तिथे नेलं होतं.
अतुल भगत यांनी सांगितलं की आपल्याला तिथे जायचंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचंय, सविस्तर चर्चा करुन निवेदन द्यायचंय, मात्र असं काही नसून तिथे आम्हाला सांगितलं की आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे. परंतु, हे समजताच आम्ही स्पष्ट नकार दिला.
आम्ही आजही राज साहेबांसोबत आहोत आणि उद्याही राहणार आणि सदैव असू. शेवटच्या श्वासापर्यंत मनसेसोबत राहू. राजसाहेब आमचे दैवत आजही आहेत, उद्याही राहतील, अखेरच्या क्षणापर्यंत असतील असे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, मनसेच्या एकूण १०० पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचं बोललं जात होतं. पनवेलमधील मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांच्यासह उरण तालुका उपाध्यक्ष, इत्यादी अनेक पदाधिकाऱ्यांचे एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याचे फोटो समोर आले होते.