Share

‘आम्हाला तुमची आवश्यकता’; राष्ट्रवादीचे पंकजा मुंडेंना पक्षप्रवेशासाठी जाहीर निमंत्रण

राज्याच्या राजकारणात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापू लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काल भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका करत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका हा धक्का नसून धोका आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ नये, सरकारने हे गांभीर्याने घ्यावे असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला सल्ला दिला. त्यामुळे ओबीसी आरक्षण महाराष्ट्राच्या हातातून गेले. हा फार मोठा गुन्हा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

यावर, अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना ऑफर दिली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा प्रश्न मला पडला. पंकजा मुंडे यांना ही कालच्या मोर्चात स्थान देण्यात आले नव्हते.

तसेच म्हणाले, माझे तर म्हणणे आहे, की पकंजा मुंडे यांचा पक्षात अपमान होत असेल तर अशा पक्षाला लाथ मारून त्यांनी आमच्या पक्षात यावं. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची दारं खुली आहेत, जिथं आपला अपमान होत असेल, अशा लोकांना लाथ मारावी. तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता आहे, असे मिटकरी म्हणाले.

याआधी धनंजय मुंडे यांनी देखील पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती. मुंबईत नेत्र चिकित्सक तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, आमित देशमुख यांच्यात लेन्सची चर्चा चांगलीच रंगली होती.

या कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या डोक्यात भावाच्या मायेनी धनंजय यांनी मारलेली टपली हा देखील राज्यात चर्चेचा विषय झाला होता. त्यावेळी आपल्या भाषणात धनंजय मुंडेंनी आदित्य ठाकरेंचा दाखला देत पंकजा यांनी महाविकास आघाडीच्या लेन्समधून पाहिलं पाहिजे, असे म्हणत त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now