Why I Kill Gandhi या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार तथा अभिनेते यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांनी विरोध केलाय. दरम्यान या सर्व गोंधळात अमोल कोल्हे यांच्यावर प्रचंड टीका होत असून वेगवेगळे आरोप केले जात आहे. या चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या निर्मात्या कल्याणी सिंह यांनी हा चित्रपट आधी पाहण्याचा सल्ला दिला आहे.
कल्याणी सिंह एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती मध्ये म्हटल्या की, मी आणि माझ्या पतीने खरी गोष्ट लोकांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन हे 30 जानेवारीला होणार होतं. ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि मतावर मी काहीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. कारण मला राजकारणामधील काही ज्ञान नाही. मी एक कलाकार आहे. मी स्वतः स्क्रिप्ट लिहिते. आम्ही आमच्या चित्रपटातून नेहमी खरं आणि चांगलं जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे गोडसेने गांधींना का मारलं ते कोर्टात सांगितलं होतं. तोच सीन आहे. जे विरोध करत आहेत त्यांनी कृपया आधी चित्रपट बघावा. असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी कल्याणी सिंह यांनी, ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाची आठवण काढत सांगितलं की, महाराष्ट्रात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक प्रचंड गाजलं होतं. त्यावेळी तर असं काही झालं नव्हतं मग आत्ताच एवढा विरोध का होत आहे? त्यामध्ये देखील तेच दाखवले आहे.
तसेच म्हणाल्या की, जे लोक वादविवाद करत आहेत मी त्यांना विनंती करते की, तुम्ही आधी चित्रपट बघा. चित्रपट पाहिल्यानंतर त्याला विरोध करायचे की नाही ठरवा. मी त्यासाठी तुम्हांला रोखू शकत नाही. 2017-18 मध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्यावेळी काही गोष्टी मिळत नव्हत्या, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात वेळ झाला.
कोर्टचे जे सीन आहेत ते जशेच्या तसे आहेत. त्यामध्ये दुसरं काही टाकलेलं नाही. जे खरे आहे तेच टाकले आहे. जे घडले आहे तेच आम्ही दाखवले आहे. नथुरामच्या भूमिकेसाठी आम्हांला मराठीचं चांगलं डिक्शन असणाऱ्या कलाकाराची गरज होती. नथुराम गोडसेच्या कोर्टातील घडणाऱ्या घडामोडींसाठी त्याची गरज होती. त्यावेळी,आमचं लक्ष अमोल कोल्हे यांच्याकडे गेलं. ते या भूमिकेसाठी एक कलाकार म्ह्णून योग्य होते. त्यांनी नथरूम गोडसे यांच्या भूमिकेला खूप चांगल्या पद्धतीने जिवंत केले आहे. असे कल्याणी सिंह म्हणाल्या.