मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं यात आम्ही काहीही चुकीचं केलं नाही, ज्यांना जनतेनी कौल दिला त्यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन केलं असं स्पष्टपणे सांगितलं.
तसेच म्हणाले, २०१९ मध्ये महाविकास आघाडी बनवल्याने केवळ जनतेलाच धोका नव्हता तर आमच्यासाठीही मोठा धोकाच होता. महाविकास आघाडी सरकार बनवताना विचारात घेणे गरजेचे होते असे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
म्हणाले, आम्ही कोणासोबत युती केली आहे, २०१९ मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात बाळासाहेब आणि मोदी यांचे फोटो लावून आम्ही मतदारांसमोर गेलो. आम्ही चुकीचं काम केलं नाही. ज्या पक्षासोबत निवडणूक लढवली आणि जनतेचा देखील हाच कौल होता की, शिवसेना -भाजप युतीचं सरकार आलं पाहिजे.
मात्र, समीकरण बदललं, दुसरं सरकार आलं, ते आम्ही दुरुस्त केलं. असे शिंदे म्हणाले. आज जनता खुश आहे. २०१९ मध्ये जे व्हायला हवं होतं, ते आम्ही आता केलं.२०१९मध्ये जे झालं ते कोणालाच आवडलं नाही, मतदारांनी युतीला कौल दिला होता. आता हे झाल्यानंतर मला खूप लोकांनी फोन करत अभिनंदन केलं, असे शिंदे म्हणाले.
२०१९ मध्ये सरकार स्थापनेच्या प्रसंगी ना जनतेचा विचार झाला ना इतरांचा. त्यामुळे हे तीन पक्षाचे सरकार मुळात जनतेलाच नको होते. परंतू, राजकीय स्वार्थासाठी हे सर्व घडून आणले गेले. सध्याचे भाजप-सेनेचेच सरकार हे जनतेच्या मनातले आहे,आणि तेच घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता असे एकनाथ शिंदे म्हणाले.
म्हणाले, मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त मेहनत करत राहिलो. मी कधीही मुख्यमंत्री व्हावं, म्हणून हे काम केलं नाही, मी नेहमी या महाराष्ट्रातील जनतेला सुखीकर, बळीराजाला सुखीकर असे मागणे गणपती बाप्पांकडे मागत असतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.