महाराष्ट्रात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. यांच्यामध्ये रोज काहीना काही आरोप -प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या वादात आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.
हनुमान चालिसेवरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य हे अनेक दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राणा दाम्पत्यांना यावर अटक देखील झाली. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका झाली. नवनीत राणा यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यानंतर, नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीकास्त्र चालू ठेवलं. उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. यावर शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या. त्यातच चंद्रकांत खैरे यांनी देखील नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली.
बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला खैरे आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना खैरे यांनी राणा यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, नवनीत राणांबद्दल मी काही बोलतच नाही. कारण मी काही बोललो तर ते व्हायरल होईल.
तसेच म्हणाले, मला त्या बाईचा इतका राग आलेला आहे. त्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलतात आणि ते राणा देखील. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात एक वेगळी अक्कल असते, किंवा आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते. आम्ही काहीही करू शकतो. असे म्हणतात.
मात्र, आता सहन होत नाही, उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांना कोणी काहीही बोलले तरी आम्हांला सहन होणार नाही. आम्ही सहन करणार नाही. असे खैरे म्हणाले, यावेळी त्यांनी नवनीत राणा यांनी जातीचे खोटे सर्टिफिकेट सादर केल्याचा देखील आरोप केला आहे. आता खैरे यांच्या टीकेला राणा दाम्पत्य काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.