आम्ही सरकार चालवत नाही, पुढचे ७/८ महीने कसेतरी सांभाळायचेत; भाजप मंत्र्याची ऑडीओ क्लिप व्हायरल

कर्नाटक मधील भाजपचे कायदामंत्री जे. सी. मधूस्वामी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, या ऑडिओ क्लिपमुळे भारतीय जनता पक्षात एकच खळबळ उडाली आहे. ‘आम्ही सरकार चालवत नाही, ते कसे तरी सांभाळत आहोत’ असे वक्तव्य या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आले आहे.

जे. सी.मधूस्वामी यांच्या या वक्तव्यांमुळे आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. कर्नाटकचे कायदा मंत्री मधुस्वामी आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील हे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांनी कर्नाटकातील व्हीएसएसएन बँकेच्या विरोधात शेतकऱ्यांची तक्रार मधुस्वामी यांच्याकडे केली होती. त्यावेळी मधुस्वामी यांनी ‘आम्ही सरकार चालवत नाही, पुढील सात ते आठ महिने आम्ही कसे तरी सांभाळत आहोत’ असे विधान केले आहे.

मधूस्वामी यांच्या विधानाने आता कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांबरोबर आता भाजप नेत्यांनी देखील मधुस्वामी यांच्या विधानाबद्दल उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. भाजपच्या सहकारी मंत्र्यांनी मधूस्वामी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

भाजपचे सहकारी मंत्री मुनीरत्न यांनी मधुस्वामी यांनी असे विधान करण्यापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मंत्री असल्याने ते सरकारचा भाग आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते सहभागी असतात. त्यामुळे सरकारच्या निर्णयामध्ये त्यांचाही सहभाग आहे. मंत्रीपदावर असणाऱ्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, असा टोला लगावला आहे.

मधुस्वामी यांच्याकडे भाजपच्या एका मंत्र्याच्या कथित निष्क्रियतेबद्दल सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांनी तक्रार केली होती, त्यावर ‘मी हा विषय सहकार मंत्री एस. टी. सोमशेकर यांना सांगितला आहे. पण ते कोणतीही कारवाई करत नाहीत, त्यामुळे आम्ही काय करावे, असेही मधुस्वामी यांनी म्हटलेले ऑडिओ क्लिपमध्ये आढळले आहे.