शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, यावर शिंदे गट ठाम आहे. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
अशातच महाविकास आघाडीसोबत असलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मोठा दावा केला आहे. चार दिवस थांबा, बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील असे त्यांनी विधान केले आहे. राजकीय वर्तुळात सध्या भुयार यांच्या विधानाची चर्चा आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. अशी परिस्थिती असताना भुयार म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही. भक्कम आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.
तसेच म्हणाले, येत्या दोन ते चार दिवसांत सगळे चित्र स्पष्ट होईल. गुवाहाटी गेलेल्या काही अपक्ष आमदारांचे मलाही फोन आले. अनेक ऑफर, आमिषे देण्यात आला. मात्र मी महाविकास आघाडीसोबत आहे असे भुयार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच भाजपवर टीका करत आमदारांना ईडीची भिती दाखवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची काही मते फुटली होती. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर आरोप केले होते. त्यांनी ज्या अपक्षांवर आरोप केले त्यात देवेंद्र भुयार यांचे देखील नाव घेण्यात आले होते. यानंतर ते प्रकाशझोतात आले .
देवेन्द्र भुयार यांचे नाव घेण्यात आल्यानंतर त्यांनी आपली बाजू आणि भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी संजय राऊत यांची भेट देखील घेतली होती. आता एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत झाली. या बैठकीला भुयार देखील उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भुयार यांनी आपलं मत स्पष्ट केलं.