कंगनासोबत काम करण्यास विवेक अग्निहोत्रींनी दिला साफ नकार, म्हणाले, मला स्टार्सची नाही तर…

32 वर्षांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील नरसंहाराची वेदनादायक कथा दाखवणारा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात 231 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ आणि प्रभासच्या ‘राधे श्याम’ला मागे टाकले आहे.

आता सर्वत्र ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘विवेक अग्निहोत्री’ची चर्चा सुरू आहे. बॉलीवूडचे अनेक स्टार्स आता विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ नंतर अभिनेत्री कंगना रणौत लवकरच विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत काम करणार असल्याच्या चर्चा देखील होत आहेत.

या चर्चांना आता विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर देऊन पूर्णविराम दिला आहे. एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांना ‘कंगनासोबत भविष्यात काम करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, मला कोणत्याही स्टारची गरज नाही. मला फक्त एक कलाकार हवाय.

तसेच म्हणाले. मला असा कलाकार हवा आहे, जो उत्तम अभिनय करू शकेल. जेव्हा मी 12 वर्षांपूर्वी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी मी माझ्या मतानुसार चित्रपट तयार करणार असा निर्णय घेतला होता. त्यामुळे,एखाद्या स्टारसोबत काम करण्यापेक्षा उत्तम अभिनय असलेल्या कलाकारांसोबत काम करणं मला अधिक आवडेल.

विवेक अग्निहोत्री यांच्या सडेतोड उत्तरांमुळे आता कंगना ही त्यांच्या पुढील चित्रपटात असेलच यावर लोकांनी चर्चा थांबवली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे सध्या राजकारणात देखील अनेक वाद-प्रतिवाद होताना दिसत आहेत. कोणी चित्रपटात अर्धवट सत्य सांगितले असे म्हणत विरोध करत आहे, तर कोणी चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद देत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी सांगण्यात आली आहे. मात्र, चित्रपटात दाखवण्यात आलेली कहाणी ही अर्ध सत्य आहे. त्यावेळी फक्त काश्मिरी पंडितांवरच नव्हे तर मुस्लिमांवर देखील अत्याचार झाले, पण ते दाखवण्यात आले नाही याबद्दल चर्चा होत आहे.