मेटाव्हर्सची चर्चा मागच्या काही दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण आघाडीची सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुकने आपलं नाव बदलून मेटावर्स असं केलं होतं. परंतु आता याच प्लँटफॉर्मवर चक्क एका महिलेचा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मेटावर्स हे पूर्णपणे आभासी जग आहे, परंतु आपल्या वास्तविक जगात जे काही घडते ते त्यात केले जात आहे. यामध्ये काही गोष्टी चांगल्या तशा वाईटही आहेत. आता यामध्ये अशी गोष्ट घडली आहे, ज्याने ऑनलाइनच्या या आभासी जीवनात आणि वास्तवात देखील खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने सांगितले की, मेटाव्हर्समध्ये सामील झाल्यानंतर 60 सेकंदांच्या आत त्या ठिकाणी तेथील काही आभासी पुरुषांनी एकत्रितपणे तिच्या आभासी शरीराचे शोषण केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे आता व्हर्च्युअल जगाविषयी आणखी शंका उपस्थित होत आहे.
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या नीना जेन पटेल ज्या एक आई देखील आहेत, त्या लंडनमध्ये राहतात. त्यांना या गैरप्रकारांचा सामना करावा लागला आहे. मेटाव्हर्समध्ये तिच्या प्रवेशाच्या एका मिनिटात, अनेक मेल वापरकर्त्यांनी प्रथम तिच्या आभासी अवताराचे शारीरिक शोषण केले. एका ब्लॉग पोस्टद्वारे पिडीतेनं तिचं अनुभवकथन सांगितले आहे. या 43 वर्षीय महिलेने सांगितले की, 3-4 पुरुष आभासी अवतारांनी तिच्यावर अत्याचार केले आणि तिच्यावर बलात्कार केल्यानंतर फोटोही काढले.
नीना जेन पटेल यांनी याविषयी माहिती देताना म्हटलं आहे की मी मेटाव्हर्सचा एक भाग बनताच, काही पुरुष आभासी अवतारांनी माझी छेडछाड करत बलात्कार केला, फोटो काढले आणि ‘अभद्र भाषादेखील वापरली’. नीना पटेल याविषयी बोलताना पुढे म्हणतात की, हे सर्व इतक्या फास्ट घडलं की त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी योग्य वेळ मिळाला नाही.
जेव्हा नीना जेन पटेलने ब्लॉग पोस्टद्वारे तिचा भयानक अनुभव शेअर केला तेव्हा मेटाने तिची माफी मागितली आणि सांगितले की काही तांत्रिक अडचणींमुळे हे घडले असावे. मेटा प्रवक्त्याने याबाबत बोलताना सांगितले की, मेटाव्हर्सच्या वापरकर्त्यांसाठी खूप आनंददायी अनुभव मिळावा अशी त्यांची इच्छा आहे, त्यामुळे ते या प्रकरणाच्या तळाशी जाऊन कारवाई करतील. त्यामुळे आता मेटावर्सवर नोंदवला गेलेला हा पहिला गुन्हा असल्याने त्याकडे जगभरातील यूजर्सचे लक्ष वेधले गेले आहे.
काही दिवसांपूर्वी मार्क झुकरबर्ग यांची प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुकने आपलं नाव बदलून मेटावर्स असं केलं होतं. त्यामुळे आता या बदलानंतर त्यातील व्हर्च्युअल जगाबाबत चर्चा सुरू झाली होती. सध्या व्हाट्सएप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मालकी मेटावर्सकडे आहे.