‘माझा होशील ना’ या मालिकेत आदित्य ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni). मालिकेतील आपल्या अभिनयाद्वारे विराजसने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तर अभिनयानंतर आता विराजस दिग्दर्शन क्षेत्राकडे वळाला आहे. विराजसने एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून नुकतीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालं आहे. यासंदर्भात विराजसने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
विराजसने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने चित्रपटातील कलाकार आणि इतर सर्व टीम सदस्यांसोबतचा एक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले की, ‘व्हिक्टोरिया चित्रपटाचे चित्रीकरण संपले. थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमची डेब्यू हॉरर चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचायला एक पाऊल पुढे आला आहे’.
विराजसने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे नाव ‘व्हिक्टोरिया’ असे आहे. विराजससोबत जीत अशोकने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दोघेही या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. आनंद मोशन पिक्चर्स आणि गुसबम्प्सद्वारे या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग करत आहेत. तर वैशल शाह सह-निर्माता आहेत.
‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता पुष्कर जोग, आशय कुलकर्णी हे कलाकार यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. नुकतीच काही दिवसांपूर्वी या कलाकारांचा चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता.
विराजसने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर करत लिहिले होते की, ‘प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच! सादर आहे व्हिक्टोरिया चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक’. कलाकारांच्या या फर्स्ट लूकमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत होत्या. तर फर्स्ट लूक पाहून चित्रपटाचे कथानक काय असेल आणि त्यात काय पाहायला मिळेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली.
दरम्यान, विराजस कुलकर्णी हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. यापूर्वी त्याने अनेक नाटक आणि लघुपटांचे दिग्दर्शन केले. मात्र, व्हिक्टोरिया द्वारे तो पहिल्यांदाच चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉटलँड येथे झाले.
महत्त्वाच्या बातम्या :
आदित्य नारायणने मुलीला दिले ‘असे’ अनोखे नाव, तुम्हीही तुमच्या मुलीला देऊ शकता अशी अनोखी नावं
सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्यालाही टक्कर देते अनु मलिकची मुलगी, पहा तिचे कधीही न पाहिलेले सुंदर फोटो
शेती करणार म्हणून अनेकांनी तिला वेड्यात काढलं, आज 18 कोटींची कंपनी चालवते, वाचा ‘मुळशी पॅटर्न’ मधील अभिनेत्रीची यशोगाथा






