शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी १४ ऑगस्ट रोजी कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. त्यातच आता त्यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मेटे यांचा अपघात नाही तर घातपात झाला अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
त्यातच आता विनायक मेटे यांच्या मृत्यू संदर्भातील महत्वाची बातमी समोर येत आहे. बीडमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंग मधील संभाषणावरून ३ ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. अशी माहिती समोर आली आहे.
मेटे यांचं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाती निधन झालं. मेटे यांच्या गाडीचा ज्या प्रकारे अपघात झाला, त्यावरून काही प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण, विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला आहे.
ज्याचा फोन रेकॉर्ड झाला त्याचं नाव अण्णासाहेब मायकर असं आहे. अण्णासाहेब मायकर हे ३ऑगस्टला मेटे यांच्यासोबतच प्रवास करत होते. या फोन कॉल रेकॉर्डमधील संभाषणावरून, ३ ऑगस्टला विनायक मेटे यांच्यासोबत आम्ही मुंबईकडे जात होतो, असे अण्णासाहेब म्हणत आहेत.
मुंबईकडे जात असताना शिक्रापूर पासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. त्यामध्ये आयशर ट्रक देखील होता. शिक्रापूर पासून ही गाडी पाठलाग करत होती, ती गाडी कधी पाठीमागे राहत होती तर कधी ओव्हरटेक करून पुढे जात होती.
यामध्ये आयशर एक ट्रक सुध्दा होता, त्यामुळे आम्हाला काही पुढे जाता येत नव्हते, अशी माहिती मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी दिल्याचं रेकॉर्डिंग मध्ये आहे. शिक्रापूर जवळ एक गाव होतं, तिथे छोटे गाव होते. तिथे अडीच किलोमीटर पर्यंत आमचा पाठलाग करण्यात आला होता.
ती गाडी मागे येत होती, पुढे जात होती. रात्री हा प्रकार घडला होता. या गाडीतील माणसं आम्हाला हात दाखवत होती. आम्ही गाडी थांबवून चौकशी करणार होतो, त्यावेळी मेटे साहेबांनी गाडीचा नंबर घेऊन ठेव, असं सांगितलं. पाठलाग करणाऱ्या या गाडीमध्ये तीन जण होते, असं मायकर यामध्ये सांगतात. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं वळण लागणार पाहावं लागेल.