शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात एक वेगळेच चित्र निर्माण झाले आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत आहे. अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर रानबाजार वेबसिरीजमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आवाज एकू येत आहे. ‘सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिला नाही. खोटी आश्वासने, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्वे या सगळ्या पुस्तकी गोष्टी आहेत.पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा’, असे अनासपुरे या व्हिडीओमध्ये बोलत आहे.
त्यानंतर या व्हिडीओमध्ये पुढे एका वृत्तनिवेदानाचा आवाज ऐकू येत आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसुफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळले होते’, असे वृत्तनिवेदिका या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर प्राजक्ताने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेदेखील रानबाजारमधील हाच व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला ‘रानबाजार’, काय मग बघताय ना? असे कॅप्शन दिले आहे.
शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.राज्यातील सरकार पडणार का? त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वच स्तरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. रानबाजार ही वेबसीरीज राजकारणावर आधारित असून प्राजक्तानेही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, प्राजक्ताच्या रानबाजार या वेबसिरीजने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या सिरीजमध्ये तिचा हटके अंदाज पाहायला मिळाला. ती सतत सामाजिक तसेच राजकीय घडामोडींवर भाष्य करत असते. त्याचबरोबर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.