नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अबुधाबीमध्ये करण्यात आले होते. अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्याला अभिनेता सलमान खानदेखील उपस्थित होता. त्यावेळी तो एका छोट्या गायकाला मिठी मारताना आणि त्याच्यासोबत फोटो काढताना दिसला.
सध्या सोशल मीडियावर जगातील सगळ्यात छोट्या गायकाची चर्चा सुरु आहे. सलमान खानही या गायकाच्या प्रेमात पडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा छोटा गायक सलमानचा खुप मोठा चाहता आहे. त्यानं सलमानसाठी एक गाणंही गायलं.
त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो छोटा गायक ‘ एक लडकी को देखा तो ऐसा लगा ‘ हे गाणे गाताना दिसत आहे. त्याच्या या गोंडस आवाजातील गाण्याने सलमान खानसोबत इतर लोकही आश्चर्यचकित झाले.
या गाण्यानंतर सलमानने या कलाकाराला मिठी मारुन त्याला शुभेच्छाही दिल्या. अब्दू रोजिक असे या छोट्या गायकाचे नाव आहे. तो सलमान सोबतच इतर कलाकारांचाही चाहता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहुन रोजिकबद्दल जाणुन घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
अब्दू रोजिक हा तजाकिस्तानचा रहिवासी असुन तो जगातील सगळ्यात छोटा गायक म्हणुन प्रसिद्ध आहे. १८ सप्टेंबर २००३ ला त्याचा जन्म झाला आहे. तो तजाकिस्तानमध्ये लोकप्रिय रॅपर आहे. ‘ अव्लोड मीडिया ‘ या नावाचे त्याचे स्वत: चे युट्युब चॅनेल आहे.
गाण्यासोबत तो एक उत्तम संगीतकार, ब्लॉगर आणि बाॅक्सिंगही करतो. तो लहानपणापासुनच रिकेट्स या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे त्याची उंची कमी आहे. ३ फुट २ इंच इतकी त्याची उंची आहे.शरिरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. त्याच्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबीयांकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्याच्या या आजारावर उपचार होऊ शकला नाही.