सध्या भारतातच नाही तर इतर देशात देखील महिलांवर होणाऱ्या बलात्काराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विरोधात जगातील कानाकोपऱ्यात स्त्रिया आवाज उठवताना दिसतात. आता युक्रेनमधील एका महिलेने चक्क रेड कार्पेटवर विवस्त्र होऊन महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या विरोधात आवाज उठविला आहे.
विवस्त्र होणारी महिला ही युक्रेनची आहे. तिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 च्या रेड कार्पेटवर अंगावरचे कपडे काढून आरडाओरडा केला. महिलेने आपल्या अंगावर युक्रेनच्या ध्वजाचे रंग लावले होते. तसेच, ‘आमच्यावर बलात्कार थांबवा’ असेही अंगावर लिहिले होते.
महिलेने अचानक रेड कार्पेटवर केलेल्या या कृत्यामुळे कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. सगळ्यांचे लक्ष या महिलेने वेधलं. या ठिकाणी हॉलिवूड अभिनेते टिल्डा स्विंटन आणि इद्रिस एल्बा 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या नवीन चित्रपट ‘थ्री थाउजंड इयर्स ऑफ लाँगिंग’ च्या प्रीमियरसाठी पोहोचले होते.
दरम्यान, या अज्ञात महिलेने अचानक आपले कपडे काढले. महिलेने आपल्या अंगावर युक्रेनच्या ध्वजाचे रंग लावले होते. तसंच लाल रंगाची अंतर्वस्त्र परिधान केली होती, ज्यावर लाल रंगात खुणा होत्या. महिलेमुळे गोंधळ निर्माण झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी आपल्या काळ्या रंगाच्या जॅकेटने तिला झाकून घटनास्थळावरून दूर नेले.
माहितीनुसार, ही महिला प्रत्यक्षात युक्रेनमधील आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. अशात युक्रेनमधील महिलांवरील बलात्काराची प्रकरणेही समोर येत आहेत. महिलांसह अनेक लहान मुलांवर देखील लैंगिक अत्याचार होत आहेत, या विरोधात या महिलेने आवाज उठवला आहे.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले होते की, गेल्या महिन्यात केलेल्या तपासात अनेक बलात्काराच्या घटना उघड झाल्या आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधील महिलांसोबतच लहान मुलांवरही लैंगिक अत्याचार करत आहेत, यामुळे तेथील महिला आणि लहान मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
.