Share

VIDEO: चुकीला माफी नाही! पुन्हा पाहायला मिळणार अरूण गवळीचा थरार, दगडी चाळ २ चा ट्रेलर लॉन्च

चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या अगोदर वाचा फोडणारा दगडी चाळीचा रॉबिन हुड म्हणजेच अरुण गुलाब गवळी ऊर्फ डॅडी. ‘ दगडी चाळ ‘ या चित्रपटात डॅडीचा थरार अनुभवला. हाच दबदबा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर अनुभवयाला मिळणार आहे. लवकरच ‘ दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी गँगवारच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अरूण गुलाब गवळी ऊर्फ डॅडी…, ही इज बॅक…, असे म्हणत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

या चित्रपटाची घोषणा करत असताना निर्मात्या संगीता अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” आज आम्हाला या चित्रपटाची घोषणा करत असताना खुप आनंद होत आहे. ‘ दगडी चाळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आम्ही या चित्रपटाचा सिक्वल करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांसोबतच माझीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड प्रदर्शित करण्याचा आमचा निर्धार आहे”, असे संगीता अहिर म्हणाल्या.

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित चंद्रकांत कणसे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

अभिनेते मकरंद देशपांडे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमधून तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या गर्दीतून समोर येणारे अरूण गवळी यांची भूमिका साकारणारे मकरंद देशपांडे यांची धमाकेदार एंट्री या ट्रेलरमधुन दाखवली आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

संगीता अहिर यांनी यापूर्वी अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमधील आघाडीची निर्माती अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ‘ दगडी चाळ’ या चित्रपटानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्या आता दगडी चाळचा सिक्वल घेऊन आल्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘ चुकीला माफी नाही ‘ हा दबदबा पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now