नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. त्याला विविध कारणे आहेत. काहींच्या प्रतिक्रिया सकारात्मक आहेत तर काहींच्या नकारात्मक. आमिर खान, धनुषपासून ते अनेकांना झुंड मास्टरपीस वाटतोय तर काहींना अनेक गोष्टी खटकत आहेत. आता या चित्रपटाबद्दल मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका केल्याने सध्या त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा नागपूर येथील क्रिडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाबद्दल जितेंद्र जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जितेंद्र जोशीने झूंड पाहिल्यानंतर इन्स्टा लाईव्ह केलंय. त्यात त्यानं हा सिनेमा नेमका कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे जितेंद्रच्या चेहऱ्यावर जखमा आहेत आणि त्या तशा असतानाही जितेंद्र लाईव्ह आला. त्यानं त्या जखमांना झुंड शी जोडलं आहे.
लाईव्ह वरती तो म्हणतो, मी असा चेहरा घेऊन लाईव्ह का करतोय, कारण मी पडलोय, मला लागलय. लाइव्ह येण्याआधी मी स्पेक्ट शोधत होतो ज्याने माझी जखम लपेल. पण माझ्या मनात विचार आला की मी जखम का लपवतोय. हा माझाच तर चेहरा आहे. हा चेहरा माझा असून लपवायची गरज काय?
मला लागलं म्ह्णून मी चेहरा लपवावा का? मी पडलो म्हणून विद्रूप दिसतो. पण आरशात तर मला बघावाच लागतो की हा चेहरा. मग मी तो कुठे लपवणार आहे. मला माहितीचय की जखम आहे माझ्या चेहऱ्यावर. झूंड एक्झॅटली तसा आहे. काहीही न लपवलेला, विदाऊट मेकअप असा आहे.
तसेच म्हणतो, नागराज मंजुळे हा माणूस तुमची गचांडी धरत नाही. तो फक्त हलगी वाजवत राहतो. हलगी वाजवून वाजवून, काय ग्रेटेस्ट गोष्टी केल्यात त्यानं ह्या सिनेमात? ही एक फनटॅस्टिक फिल्म आहे. महानायकाला आणि महामानवाला एकाच फ्रेम मध्ये आणले आहे. मला या चित्रपटातील टीमला भेटायचं आहे. अमिताभ बच्चन यांना देखील मी याआधी असं काम करताना पाहिलं नाही असे म्हणतो.
या लाईव्ह मध्ये नागराज मंजुळे देखील सहभागी झाले होते. जितेंद्रने त्यांचे तोंडभरून कौतुक केले. म्हणाला, तू झुंड बनवलास, त्याला एक मित्र म्ह्णून, समाजातील एक नागरिक म्हणून, मी जो काही आहे माझ्या बऱ्या वाईट समजासह ते सर्व सोबत ठेवून तुझे आभार मानतो. तू हा चित्रपट निर्मिती करून माझ्या आणि आसपासच्या माणसांवर उपकार करत आहेस, असे म्हणाला.