Share

मनसे नेत्याचा राज ठाकरेंना घरचा आहेर; म्हणाला, ‘राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही’

raj
मशिदींवरील भोंग्यावरून चांगलच राजकीय वातावरण तापले आहे. गुढीपाडवा मेळाव्यातील मनसेप्रमुख राज ठाकरेंचे भाषण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मनसैनिक आणि भाजप नेते राज याच्या भाषणाचे समर्थन करत असले तरी मोठ्या प्रमाणात इतर राजकीय पक्ष त्यांच्या भाषणावरुन टीका करत आहे.

तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत, तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. सोमवारी मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हनुमान चालिसा सुरू करण्यात आली होती.

मंगळवारी नाशिकमध्ये देखील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. नाशकातील भद्रकाली परिसरातही मनसेने भोंगे लावले होते. असे असले तरी काही मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला स्पष्ट नकार दिला आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेला नकार दिला आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “राज यांनी जो शब्द वापरला तो, ‘जर मशीदींवरील भोंगे काढले नाही तर..’ असा होता. मी स्टेजवर होतो, मी भाषण ऐकलं आहे. तर भोंगे कुणी काढायचे आहेत. सरकारने भोंगे काढायचेत. सरकारने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी,” असं म्हटलं आहे.

पुढे बोलताना मोरे म्हणाले, “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीये. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं. याचबरोबर मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही असं सांगितलं.

दरम्यान, ‘मी राज ठाकरे आणि पक्षावर नाराज नाही. मात्र माझ्या आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदार जास्त आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मनसेच्या एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

मशिदींवर लावलेले भोंगे काढले नाही, तर त्याच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनूमान चालिसा लावू, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी मनसेने हनूमान चालिसा लावली. त्यामुळे पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ शाखेचे अध्यक्ष अमीन शेख यांनी राजीनामा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now