महाराष्ट्र राज्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारचा पायउतार झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आले. एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली.
सत्ता येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णयांची घोषणा केली. तसेच महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. त्यात प्रभाग रचनेवर घेतलेला महाविकास आघाडीचा निर्णय देखील शिंदे सरकारने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
माहितीनुसार, प्रभाग रचना यासोबतच सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणारे निर्णय हे सरकार घेणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
वसंत मोरे यांनी ट्विट केले आहे, त्यात लिहिले आहे की, सरकार बदलले. असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल.
https://twitter.com/vasantmore88/status/1544989448110329856?t=Ekh89Qr-bOPPckM482uDOA&s=19
वसंत मोरे यांच्या ट्विटमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. माहितीनुसार, नागरिकांमधून सरपंच निवडून देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र, महाविकास आघाडी सत्तेवर येताच त्यांनी हा निर्णय बदलला होता. मात्र, आता ते परत सत्तेत आल्याने त्यांनी आपल्या जुन्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
सत्ता येताच शिंदे सरकारने घेतलेले तीन मोठे निर्णय म्हणजे, राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा निर्धार आहे. तसेच रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा या सरकारने केली आहे.