या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. औरंगाबादेत होणाऱ्या सभेआधी राज ठाकरे काल पुण्यात पोहोचले होते. राज ठाकरे आज पुणे येथून औरंगाबादला निघणार आहेत. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
परंतु तत्पूर्वी ही सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी राज यांना पुण्यातील चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५० ब्राह्मणांकडून आशीर्वाद दिला जाणार आहे. यासाठी पुण्यातील राजगड येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर देखील झाले आहेत.
तर दुसरीकडे पुण्यात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जेव्हा शुक्रवारी राज ठाकरे यांचं पुण्यात आगमन झालं तेव्हा पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते.
तसेच आज सकाळपासून देखील पुण्यातील राज ठाकरे यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात मनसैनिक आणि पदाधिकारी जमले आहेत. मात्र वसंत मोरे गैरहजर आहेत. त्यामुळे अजूनही मोरे हे पक्षाला नाराज आहे का? या चर्चाना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज यांच्या बदलत्या भूमिकेवर बोट ठेवत पक्षाला घरचा आहेर दिला होता.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावणाऱ्या, पुढाकार घेणारे वसंत मोरे गैरहजर असल्याने त्यांनी मनसेला रामराम ठोकला की काय? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. गुढीपाडवा मेळाव्यातील मनसेप्रमुख राज ठाकरेंचे भाषण सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत, तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज यांनी दिला होता. असे असले तरी काही मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला स्पष्ट नकार दिला आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेला नकार दिला होता.
त्यानंतर पक्षाने मोरेंविरोधात मोठं पाऊल उचललं. मोरे यांना थेट पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर मोरे यांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली होती. ‘आपण पक्षातच राहणार आहोत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. मात्र मनसे सोडून जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्टच सांगितलं होतं.