पुणे : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचे नवे प्रकरण सध्या पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक निलेश माझिरे यांना मनसे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदावरून हटवले. त्यानंतर निलेश माझिरे हेही आक्रमक झाले आणि त्यांनी 400 कार्यकर्त्यांसह पक्ष सोडण्याची घोषणा केली.
या सर्व राजकीय वादातून आता वसंत मोरे आणि नीलेश माझिरे यांच्यात कटुता निर्माण झाली आहे. नीलेश माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर वसंत मोरे यांनी आपला आता त्यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले होते. या वक्तव्याने दुखावलेल्या निलेश माझिरे यांनी मलाही वसंत मोरे यांची गरज नसल्याचे म्हटले आहे.
निलेश माझिरे म्हणाले की, माझिरे पक्षात नसतील तर आता त्यांचा आणि माझा संबंध नाही असे वसंत मोरे म्हणालेत. मला त्यांना विचारायचे आहे की पक्ष सोडला तर आमची मैत्री संपली का? पक्ष सोडला तरी आपली मैत्री कायम राहील, हा त्यांता शब्द होता. म्हणूनच वसंत मोरे यांचे वक्तव्य ऐकून मला खूप वाईट वाटले. पण आता वसंत मोरे यांना माझी गरज नाही, तर मलाही त्यांची गरज नाही.
निलेश माझिरे म्हणाले की, तात्या संकटात असताना मी सोबत होतो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र, आता मी अडचणीत आल्यामुळे तात्यांनी असे म्हणणे चुकीचे आहे. मला तात्यांनी सांगीतलं फोन बंद ठेवा, महाराष्ट्र सैनिक व्हा. पण त्यासाठी मला कारण हवे होते. राज ठाकरेंनी माझ्याकडून हे पद हिसकावून घेतल्याचे मला दु:ख नाही.
महाराष्ट्र सैनिक माझ्या मागे उभे आहेत. वसंत मोरे यांनी नाते तोडण्याचा निर्णय घेतला असेल तर मी नाते का ठेवू, असे नीलेश माझिरे यांनी सांगितले. राज साहेबांबद्दल बोलायचे झाले तर ते माझे विठ्ठल आहेत. माझा वाद बडव्याशी आहे.
आता कोणीतरी विचारले की नीलेश माझिरे यांच्यासह पक्ष सोडून गेलेले 400 कार्यकर्ते कुठे आहेत? मात्र याच निलेश माझिरे यांनी दोन महिन्यांपूर्वी २०० जणांना पक्षात आणले होते. मी ते विकत घेतले का? तरीही वेळ आणि जागा सांगा, मी 400 काय 1000 कर्मचाऱ्यांसह तिथे पोहोचेन, असे निलेश माझिरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा होत होती. त्यानंतर पक्षाचे माथाडी सेनेचे अध्यक्ष निलेश माझीरे यांनी वैतागून पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी पुण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांवर अनेक आरोप लावले होते.
निलेश माझीरे हे वसंत मोरेंचे कट्टर समर्थक आहेत. पण त्यांनीच राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण वसंत मोरेंनी पुन्हा त्यांना पक्षात आणले असून राज ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांना पुन्हा त्यांचे पद देण्यात आले होते. राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. पण पुन्हा राज ठाकरेंनीच त्यांची हकालपट्टी केली आहे.
काही दिवसांपुर्वी वसंत मोरेंनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले होते की, जोपर्यंत राज ठाकरे येत नाहीत तोपर्यंत शहर कार्यालयात पाऊल ठेवणार नाही. त्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांवरही आरोप केले होते.
जेव्हा राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत आपली भूमिका मांडली होती त्यानंतर त्यांनी या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांना पुणे मनसेमधून बाहेर फेकल्याचे बोलले जात होते. या सर्व प्रकारानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं आणि राजकारण तापलं होतं.
पायउतार झाल्यापासून वसंत मोरे वारंवार शहरातील मनसे नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यातच निलेश माझीरे यांचा राजीनामा हा पुणे मनसेसाठी फार मोठा धक्का मानला जात होता. शिवसेना नेते सचिन अहिर यांनी काही दिवसांपुर्वी निलेश माझीरे यांची भेट घेतली होती.