मागील काही दिवसांपासून आपल्या मनोरंजन क्षेत्रात दुःखद घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर बुधवारी (१६ फेब्रुवारी) ज्येष्ठ गीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. त्याचबरोबर सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
यामध्ये मराठी गायक आनंद शिंदे यांचा मुलगा आणि ‘बिग बॉस मराठी ३’ फेम डॉ. उत्कर्ष शिंदेने देखील बप्पी दा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उत्कर्षने एक जुना फोटो पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिलिंद शिंदे, बप्पी दा, आनंद शिंदे तसेच ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर दिसत आहे.
हा फोटो पोस्ट करत उत्कर्षने लिहिले की, ‘‘आनंद शिंदे तुम मराठी का मायकल जॅक्सन है – लेजेंड संगीतकार बप्पी लहिरी..’ नवीन पोपटचा सुपरहिट काळ सुरू झाला होता. जिकडे तिकडे याच गाण्याची चर्चा सुरू होती. कैक अवॉर्डस पटकावणारे नवीन पोपट हे आगळा वेगळा गीत ज्यासाठी पप्पांना (आनंद शिंदेंना) पहिले‘प्लॅटिनम डिस्क’ अवार्ड मिळाले. हे अवार्ड संगीतकार बप्पी लहिरी दा यांच्या हस्ते मिळाले. “आनंद शिंदे तुम मराठी का मायकल जॅक्सन है” तुम्हारा ये नवीन पोपट मुझको बहुत पसंद आया है| ये गाना मे हिंदी मे बनायेंगे असे म्हणत पहिले मराठी गीत हिंदीत रिमेक करण्यात आले.’
त्याचबरोबर उत्कर्षने पुढे लिहिले की, ‘जगभरात मराठी गीताचा डंका वाजला होता. कारण आनंद शिंदेचे लोकगीतातला नवीन पोपट हे गाणं अफाट गाजले होते. ‘नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’ हे आपलं मराठी लोकगीत ज्याने हिंदी बॉलीवूडलाही भुरळ घातली होती. आणि हे गाणं हिंदीत करावा याचा अट्टाहास संगीतकार बप्पी लहरी यांनी निर्मात्यांकडे धरला. ‘पाप की दुनिया’ या चित्रपटात संगीतकार बप्पी लहरी यांनी महागायक किशोर दा यांना घेऊन ‘नवीन पोपट हा’ हे गाणं ‘मै तेरा तोता तु मेरी मैना’ अशा स्वरुपात हिंदीत रिमेक केले.
तसेच उत्कर्षने पुढे लिहिले की, ‘आनंद शिंदे तुम्हारा व्हॉइस पहाड है डिफरेन्ट है म्हणणारे गुरुतुल्य महागायक संगीतकार बप्पी लहिरी दा आपल्याला सोडून गेले ही बातमी ऐकून वाईट तर वाटलेच. पण तोही दिवस आठवला. जेव्हा टी सीरिजच्या गोल्डन चेरी रेकॉर्डिंग स्टुडिओत पप्पांनी मला बप्पी लहिरी यांच्याशी भेट करून दिली होती. बप्पी लहिरी दा तेव्हा पप्पांना भेटल्या भेटल्या “मायकल जॅक्सन कैसा है तुम” म्हणत मिठी मारली. तो क्षण आजही जशाचा तसा मला आठवतो. मोठी माणसं का मोठे असतात, कारण त्यांचे पाय जमिनीवर असतात याचे उदाहरण म्हणजे संगीतकार बप्पी लहिरी दा.’
अशा पद्धतीने उत्कर्ष शिंदेने बप्पी दा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर अनेक बॉलीवूड कलाकार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट करत बप्पी दा यांना श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देखील देत आहेत.