Donald Trump Tariff On India: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातील निर्यातीवर तब्बल 25 टक्के आयातशुल्क (Tariff) आणि अतिरिक्त दंड लावण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून होणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच वेळी अमेरिकेने पाकिस्तानसोबत मोठा तेलसाठा विकास करार करून भारताला धक्का दिला आहे.
भारतावर वाढीव टॅरिफचा निर्णय
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितलं की, भारत स्वतः अमेरिकन उत्पादनांवर जगातील सर्वाधिक शुल्क लावतो, शिवाय भारत मोठ्या प्रमाणावर रशिया (Russia) कडून कच्चं तेल आणि लष्करी साहित्य विकत घेतो. त्यांना हे अजिबात मान्य नाही. त्यामुळे भारतावर 25% टॅरिफ आणि अतिरिक्त दंड आकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
पाकिस्तानसोबत हातमिळवणी
भारतावर वाढीव शुल्क लावण्याची घोषणा करतानाच ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेलसाठा विकासाचा करार जाहीर केला. त्यांच्या मते, अमेरिका आणि पाकिस्तान मिळून प्रचंड तेलसाठ्याच्या विकासावर काम करतील आणि एका अमेरिकन कंपनीकडून ही सुविधा पाकिस्तानला दिली जाईल. ट्रम्प यांनी सूचक पद्धतीने म्हटलं – “कदाचित पाकिस्तान कधीतरी भारतालाही तेल विकेल.”
या करारात भारताला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आलं आहे. तेलसाठा विकास कराराद्वारे पाकिस्तानला झुकतं माप देत अमेरिकेने द्विपक्षीय आर्थिक संबंध बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा निर्णय भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचा ठरत आहे.
ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेला पुन्हा “महान देश” बनवण्याच्या उद्दिष्टाने कठोर व्यापार धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जगभरातील अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याची योजना तयार केली होती. भारत आणि अमेरिका यांच्यात यापूर्वी व्यापार करारासाठी चर्चा सुरू होती, मात्र त्यात सहमती न झाल्याने अखेरीस भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा करण्यात आली.
रशिया-युक्रेन युद्धाचा आधार
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत हा चीननंतर रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करणारा सर्वात मोठा देश आहे. रशियाच्या युक्रेनवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतावर टॅरिफ आणि दंड लादण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.






