लग्नाच्या हळदी समारंभाच्या वेळी लग्नमंडपाजवळ असणाऱ्या विहिरीत पडून 13 मुली आणि महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ निर्माण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
ही दुर्दैवी घटना कुशीनगर जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया भागात घडली आहे. माहितीनुसार, नेबुआ नौरंगिया पोलिस स्टेशन हद्दीतील नौरंगिया टोला येथे बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास परमेश्वर कुशवाह नावाच्या व्यक्तीच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अनेक महिला मुली उपस्थित होत्या.
त्या कार्यक्रमाचा आनंद घेत मंडपाजवळ असणाऱ्या काही महिला व मुली विहिरीच्या वर असणाऱ्या स्लॅबवर बसून होत्या. पण मोठ्या संख्येने महिला विहिरीच्या स्लॅबवर बसल्याने, वजन अधिक होऊन स्लॅब खाली कोसळला. त्यामुळे त्यावर बसणाऱ्या सर्व महिला आणि मुली देखील एका क्षणात विहिरीत पडल्या.
त्यानंतर, स्थानिकांनी मोठी शिडी आणून तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. पाठोपाठ स्थानिक प्रशासन तसेच अग्निशमन जवानही घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. विहिरीमधून 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत जवळपास 30 जण जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे झालेला अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. यामध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ”
दुसरीकडे मुख्यमंत्री योगींनी देखील तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.