सध्या महाराष्ट्रात सर्वत्र उकाडा वाढला आहे. उष्णता वाढल्याने अनेक लोक त्रासले आहेत. अशावेळी उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक एसी, कुलर या गोष्टींचा वापर करू लागतात. तुमच्याकडेही कुलर असेल किंवा घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
घरातील कुलरमुळे एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला कुलरचा शॉक एवढा बसला की त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. ही दुर्दैवी घटना चंद्रपूर येथे घडली आहे. मृत्यू पावलेला हा चिमुरडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा आहे. महेश जेंगठे हे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांच्या मुलाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महेश जेंगठे यांना दोन मुलं आहेत. त्यातील एका लहान मुलाचा मृत्यू झाला. मुलाचे नाव युग आहे. घटनेच्या दिवशी युग आपल्या मोठ्या भावासोबत आणि इतर मित्रांसोबत सकाळी 11:30 वाजता घराच्या अंगणात खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याचा चालू असलेल्या कुलरला हात लागला आणि त्याला शॉक बसला.
युग हा सेंट अँन्स हायस्कुलचा के.जी.चा दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो मागील महिन्यांपासून घरीच राहत होता. मात्र खेळता खेळता काळाने त्याच्यावर घाला घातला आणि शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
त्यामुळे जर तुम्ही देखील नवीन एसी, किंवा कुलर घरामध्ये घेत असाल तर तो प्रथम तपासून नक्की पाहा. जुना कुलर असेल, तर तो देखील पूर्णपणे दुरूस्त आहे का पाहावे. कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा तुमच्या कुटुंबासाठी कधी दुःख घेऊन येईल सांगता येत नाही.
अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात जिथे पालक घरातील विजे संदर्भांत असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. बिघडलेल्या वस्तू, वायर या दुरुस्त करत नाहीत. त्यांच्या या थोडयाशा बेजबाबदारपणामुळे मुलांना, किंवा घरातील इतर लोकांना शॉक बसून आपले प्राण गमवावे लागले आहेत.