अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या पत्राबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे.
भाजपला पाठवण्यात आलेल्या या पत्रात राज ठाकरे यांनी लिहिले की, आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके याच निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेता भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा.
राज ठाकरे यांनी भाजपला उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यास विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला फायदा होईल, अशी चर्चा आहे.
मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. अरविंद सावंत म्हणाले, राज ठाकरे यांनी भूमिका घेण्यास खरंतर उशीर केला आहे. मात्र देर आये दुरूस्त आये, परंतु या निवडणुकीआधी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं आहे.
तसेच म्हणतात, हे गलिच्छ राजकारण आमच्यासोबत होत असताना राज ठाकरे कुठे होते. एकनाथ शिंदेंच्या राजकारणामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नावही गोठवण्यात आलं, तेव्हा राज ठाकरे कुठे होते आणि ऋतुजा लटके यांचा महापालिका राजीनामा स्वीकारत नव्हती तेव्हाही राज ठाकरे कुठे होते, असे अरविंद सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले.
एवढेच नाही तर अरविंद सावंत म्हणाले, अंधेरी पूर्व निवडणुकीत ऋतुजा लटके उभा राहिल्या आहेत, त्यामुळे निवडणुकीतील पराभव पाहता भाजपनेच राज ठाकरेंना असे पत्र लिहायला सांगितले असेल, आणि नंतर भाजप म्हणेल की राज ठाकरेंच्या पत्राचा मान आम्ही राखला. हा भाजपचा सर्व प्लॅन असेल अशी शंका सावंत यांनी उपस्थित केली.