Uddhav Thackeray : ..तर तेव्हाच ३०/४० आमदारांना डांबून ठेवलं असतं; शहांच्या टिकेला उद्धव ठाकरेंचे सणसणीत प्रत्यूत्तर

Uddhav Thackeray : राज्यातील सत्तांतरणानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांच्या सतत एकमेकांवर टीका सुरु आहेत. यातच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना काल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

“मुंबईच्या राजकारणात भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला आहे त्यामुळे धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा,” अशी टीका अमित शाहांनी ठाकरेंवर केली होती. यावर ठाकरेंनी पलटवार केला आहे.

आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. याठिकाणी त्यांनी अमित शाहांनी वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “काल मुंबईत मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले, काल गणपतीच्या मंडपातदेखील राजकारण दिसलं. गणपती जिथे आहे तिथे काही बोलू नये, परंतु ते बोलून गेले.”

तसेच “गणपती हा बुद्धीचा दाता आहे, त्यांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी,” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर लगावला. अमित शाहांच्या जमीन दाखवण्याच्या वक्तव्यावरून बोलताना ते म्हणाले की, “काल ते जमीन दाखवायची म्हणाले. थोडक्यात काय तर संघर्षाचा काळ आहे. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. पसाराभर नासलेली लोक असल्यापेक्षा मूठभर निष्ठावान असतील तर मैदान जिंकू शकतो.”

तसेच “शिवसेना ही काही माझी खासगी मालमत्ता नाही. मला मुख्यमंत्रीपद हवं असतं तर माझ्याकडे तेव्हा ३०-४० आमदार होते. त्यांना तेव्हाच डांबून ठेवता आलं असतं. माझीही ममता बॅनर्जींसोबत ओळख होती. त्यांना तिकडे घेऊन गेलो असतो. कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. परंतु, तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सगळ्यांना सांगितलं की, दरवाजा उघडा आहे. राहायचं असेल तर निष्ठेने राहा, नसेल राहायचं तर तिकडे जा. आता माझ्यासोबत कडवड शिवसैनिक आहेत,” असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत बोलण्यासाठी माझ्या तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे मला जपून बोलावं लागायचं. परंतु आता तसं नाही,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Sanjay Shirsat : मंत्रीपद नाकारलेले बंडखोर संजय शिरसाट अजूनही शिंदेंवर नाराजच? वाचा आता काय घडलं…
Supreme Court : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सर्वोच न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
BJP : शरद पवारांना रोखण्यासाठी भाजप आक्रमक, बारामतीत राबवणार अमेठी पॅटर्न; ‘हा’ आहे गेम प्लॅन?
Politics: ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात; खैरेंनी नवनीत राणांची लाजच काढली