Uddhav Thackeray : लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर दिवसभर चर्चेचा धुरळा उडाला.* सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदान झाले आणि २८८ विरुद्ध २३२ मतांनी विधेयक मंजूर झाले. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका करत थेट इशारा दिला.
उद्धव ठाकरेंचा सवाल – हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही?
प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.
“वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या हिताचे असल्याचे सांगितले जात आहे, पण हिंदू मंदिर व्यवस्थापनात गैर-हिंदूंना बसवले तर ते आम्ही सहन करू का?” “वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम असतील तर मुसलमानांना ते मान्य होईल का?”
“देशाच्या विकासावर चर्चा न होता फक्त हिंदू-मुस्लिम राजकारण होत आहे,” असे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
“भाजपाला निवडणुकीत मोठा फटका बसणार” – ठाकरे
“या विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही, पण भाजपाने मुसलमानांचे लांगूलचालन केले आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. “हिंदू जागा झाला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा फटका बसणार आहे,” असे त्यांनी भाकीत केले. “जेडीयू आणि टीडीपीसारख्या मित्रपक्षांनीही मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात जाऊ नये, असे स्पष्ट केले. पण अमित शाह आणि भाजपातील इतर नेते त्यावर बोलण्याचीही हिंमत करू शकले नाहीत,” अशी घणाघाती टीकाही केली.
“मी भाजपाचा अंधभक्त नाही” – उद्धव ठाकरे
“काँग्रेसच्या दबावामुळे आमची भूमिका नाही, आम्ही एनडीएमध्ये असतो तरीही वक्फ विधेयकाला विरोधच केला असता,” असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार टीका होते की, “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत.” यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी “तेव्हा नरेंद्र मोदीही घरूनच काम करत होते,” असा जोरदार टोला लगावला.
वक्फ सुधारणा विधेयकावरून राजकीय वातावरण तापले
हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत कसोटी लागणार आहे. उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. आता राज्यसभेतील मतदान आणि त्यावर होणाऱ्या राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष आहे.