शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना काल ईडीने अटक केली. त्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावर आता बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
दीपक केसरकर म्हणाले, केवळ राजकीय व्यक्तीवर कारवाई झाली असे नाही. जे निर्दोष असतील त्यांनी पुरावे सादर करावे. या पूर्वी भावना गवळी, यामिनी यादव आदींनी पुरावे सादर केल्यामुळेच त्यांच्यावरील कारवाई थांबली. राऊतांच्या घरी जाणारे उद्धव ठाकरे हे यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावरील कारवाईनंतर भेटायला गेले नाहीत.
यामिनी जाधव व भावना गवळी यांना स्वतःलाच ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले, असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच म्हणाले, जर संजय राऊत दोषी आढळले असतील तर त्यांना कस्टडी दिली जाईल. आम्ही त्यांना अटकेची मागणी कधीही केली नाही.
त्याचे चुलत भाऊ मागील वर्ष भरापासून तुरुंगात आहेत. चौकशी सुरू असतात तेव्हा पुरावे बदलण्याचा प्रयत्न करू नये, त्यांची क्लिप व्हायरल झाली त्यात ते ईडीला जो जवाब दिला तो बदलण्यास सांगत आहेत. बिल्डरला रोखण्याचे काम या कारवाईतून होत आहे, असे केसरकर म्हणाले.
तसेच जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील शिवसेना संपणार असं विधान केलं त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, राज्यात फक्त भाजप-सेना युती आहे. त्यामुळे ते म्हणाले असतील की महाराष्ट्रात भाजप सेना राहणार. ज्या शिवसेनेने त्यांना फसवलं त्यांच्याबद्दल त्यांचे म्हणणे असेल असे केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं.
दरम्यान, रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. संजय राऊतांना अटक केल्यामुळे सध्या शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.