Share

Shivsena : ‘ उद्धव ठाकरेंना १९९६ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी आम्हाला खोटं बोलायला भाग पाडलं’

सध्या ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. आता शिंदे गटातील माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सुरेश नवले हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासू मी कधीच नव्हतो, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील होतो.

तसेच म्हणाले, १९९६ मध्ये उद्धव ठाकरेंची इच्छा होती की, बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मी, अर्जुन खोतकर, चंद्रकांत खैरे आणि काही आमदारांना बाळासाहेबांकडे पाठवलं आणि ‘मला (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री करा’ असा आग्रह धरण्यास सांगितलं होतं.

उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर, आमची इच्छा नसतानाही आम्ही काही जण बाळासाहेबांकडे गेलो, असे सुरेश नवले म्हणाले. पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या निरोपानुसार आम्ही बाळासाहेबांपुढे आग्रह धरला, त्यामुळे मनोहर जोशीही आमच्यावर नाराज झाले होते.

नवले म्हणाले, बाळासाहेबांकडे गेल्यानंतर बाळासाहेबांनी आम्हाला प्रतिप्रश्न केला की, तुम्ही उत्स्फूर्तपणे सांगताय की तुम्हाला कोणी सांगायला लावतंय, पण आम्ही त्यांच्याशी खोटं बोललो, की आम्हाला कोणी सांगितलेलं नाही, पण आम्हाला सांगणारे उद्धव ठाकरेच होते, असे नवले म्हणाले.

सुरेश नवले म्हणाले, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळावं ही १९९६ पासूनची उद्धव ठाकरेंची इच्छा होती. मात्र  बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेचा अंदाज असावा म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. त्यामुळे १९९६ ते २०१९ या कालावधीपर्यंत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा लोभ होताच, असे नवले म्हणाले.

मात्र ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला, त्यावेळी त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली, असे नवले म्हणाले. आता नवले यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या धक्कादायक आरोपांवर शिवसेना काय उत्तर देणार पाहावं लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now